बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्या प्रकरणी पवईतून दोघांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

बेकायदेशीरपणे बंदुक विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना पवईतून अटक करण्यात आली आहे. सचिन किशवाह (१८) आणि अमरकुमार बादशाह नई (२३) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांच्या युनिट – १०ने ही मोठी कारवाई केली.

पवई परिसरात दोन व्यक्ती शनिवारी बेकायदेशीर बंदुक विकण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती मुंबई पोलीस युनिट १० ला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने विश्वासार्ह गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला होता.

पोलीस पथक पाळत ठेवून असतानाच मिळालेल्या वर्णनाचे दोन इसम संशयित हालचाली करत असल्याचे लक्षात येताच त्यांना सावधानतेने ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात पोलिसांना चार जिवंत राउंडसह देशी बनावटीचे दोन पिस्तूल मिळून आले.

जप्त केलेल्या बंदुकांची अंदाजे किंमत एक लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून, पोलिसांनी याशिवाय आरोपींकडून सहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल देखील जप्त केले आहेत.

अटक दोन्ही तरुण हे मध्य प्रदेशातील कटनीमधील मुरवारा येथील रहिवासी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये बेकायदेशीर शस्त्रे विकण्याचा त्यांचा डाव होता.

या दोघांविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात आर्म्स ॲक्ट आणि मुंबई पोलिस ॲक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  असून, हे प्रकरण आता पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!