पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
गारमेंट कामगार असणारे अजित लाड आपली पत्नी शीला हिच्यासोबत पवईतील खालचा तुंगा, शिवशक्तीनगर येथील सुखशांती हौसिंग सोसायटीत राहत होते. “सोमवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला येथील एका नागरिकाने एक महिला बेशुद्ध अवस्थेत घरात पडली असून, तिचा मृत्यू झाला असावा अशी माहिती दिली होती. पवई पोलीस मोबाईल १ हिने त्या ठिकाणी जावून त्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे जावून तिची पाहणी केली असता तिच्या डोक्याला मार लागून तिचे केस रक्ताने माखलेले आढळून आले. तसेच तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राचे घाव मिळून आल्याने हा खून असल्याची खात्री पटताच आम्ही खुनाचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.”
“आम्हाला घरात मृत महिलेच्या पतीने मराठीत लिहलेली एक चिट्ठी मिळून आली आहे. ज्यात तिच्या पतीने लिहिले आहे की, मी अजित लाड माझ्या बायको शिलासह देवाघरी जात आहोत. आमच्यावर कर्ज आहे. त्यामुळे आम्ही दोघेही जीवन संपवत आहोत. माझी बायको आजारी असल्यामुळे तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही, कारण तिला कोण सांभाळणार. आम्ही हे जे कृत्य केले आहे त्यात कोणाचाही दोष नाही. कोणालाही जबाबदार धरू नये.
शिलाची भाची अर्चना चोप्रा (सासरचे नाव) जिचा गारमेंट व्यवसाय आहे. तिने आम्हाला खूप मदत केली पण loss झाला. माझ्यावर एक लाख ऐंशी हजाराचे कर्ज आहे. मी संपूर्ण वर्षभर हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला मात्र मी मुद्दल आणि व्याज देवू शकलो नाही. मी अजून कितीदिवस कोणासमोर हात पसरत राहणार. म्हणून मी हे कृत्य करत आहे. शेवटी अजित लाड असे नाव मराठीत लिहले आहे,” असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
“महिलेचा पती जो दररोज सकाळी ९ वाजता कामासाठी निघतो, तो त्या दिवशी सकाळी ७.३० वाजताच बाहेरून दरवाजाला कडी घालून निघून गेला आहे,” असेही याबाबत बोलताना एका तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.