@विनिता सावंत, प्रमोद चव्हाण
ये रे घना, ये रे घना…
गोष्ट सांग माझ्या मना!
बाहेर पडणारा पाऊस, आत वाफाळता चहा आणि जोडीला गोष्ट सांगणारं कुणीतरी! गोष्ट? ती कुठून आली मध्येच? हो… गोष्टच! आपण कितीही मोठे झालो ना, तरी कुणी गोष्ट सांगतंय म्हटल्यावर आपण कान टवकारून बसतो! बुधवार, २८ जूनला पवईमध्ये या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या. निमित्त होते ते ‘मराठी सांस्कृतिक मंडळा’तर्फे आयोजित कथाकथनाचा कार्यक्रम.
पवई, चांदिवली परिसरातील मराठी लोकांना एकत्र आणून दर्जेदार कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने मराठी सांस्कृतिक मंडळाने बुधवारी संध्याकाळी सौ. मंजिरी देवरस यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिरानंदानी गार्डन्स येथील ‘जस्ट किडिन’ शाळेच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
योगयोग तो पहा! पावसाळ्याची सुरुवात झाली असून, सोमवारपासून पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. त्यातच बुधवारी तो मुसळधार बरसत होता. त्यामुळे तो होताच! मंजिरी ताई आणि पाऊस या दोघांबरोबर मस्त गरमागरम चहाची भट्टी अशी काही जमली, की सर्व श्रोते एकदम खुश झाले.
कथा ऐकण्यासाठी खालील प्ले बटनवर क्लिक करा !
बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना देखील मंजिरी ताई आणि लाख मोलाचे श्रोते दोघेही या पावसाबद्दल किंचितही तक्रार न करता वेळेवर दाखल झाले. मंजिरी ताईंनी मराठी साहित्य विश्वातील दिग्गज अशा काही लेखकांच्या निवडक कथा स्वतःच्या खास शैलीत यावेळी सादर केल्या. कथेतील काही ठिकाणचा नर्म विनोद आणि काही ठिकाणची खळखळून हसवणारी वाक्ये… सर्व काही मनाला भावले ते मंजिरी ताईंच्या खुमासदार शैलीमुळे.
जवळपास दीड तास सर्व श्रोते मंजिरीताईंच्या गोष्टींचा चहाच्या घोटाबरोबर – प्रापंचिक जबाबदाऱ्या विसरून आस्वाद घेत होते. आवाजातले चढ उतार, काही वाक्ये नाट्यपूर्ण बोलण्याची पद्धत, शब्दफेक आणि न वाचता १००% आत्मविश्वासाने सांगितलेल्या गोष्टींमधून मंजिरीताईंनी उपस्थितांची मने जिंकली.
उपस्थित मराठी श्रोत्यांच्या प्रतिकिया आणि मागणीनंतर मराठी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने लवकरच पवईकरांसाठी पुढील कार्यक्रम घेऊन येण्याचे आश्वासन देत या कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments yet.