ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, दिवसभरात कित्येक लोक या सायबर चोर आणि त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांचा तपास आणि रक्कम मिळवणे मोठे आव्हान असते. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून अनोळखी इसम फसवत असतो. मात्र पवई पोलिसांच्या सायबर टीमने नुकत्याच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची संपूर्ण मुंबईभर चर्चा असून, त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पवई येथील एस एम शेट्टी शाळेजवळ राहणारे ४५ वर्षीय शाकीब सईद यांनी ऑनलाईन वाईन ऑर्डर करण्यासाठी ५ डिसेंबरला पॉली वाईन नामक दुकानाचा नंबर गुगलवर सर्च केला होता. त्यांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकवर संपर्क करून वाईन ऑर्डर केली. “यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने वाईन डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने त्यांना ऑनलाईन पेमेंट लिंक पाठवून त्यांना त्यावर पेमेंट करण्यास सांगितले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, व्यवहारा दरम्यान पाठवलेल्या लिंकच्या मदतीने समोरील व्यक्तीने सईद यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याद्वारे तक्रारदार यांच्या खात्यातून एकूण ९८९१५ रुपये अवैध ट्रान्सँक्शन करून फसवणूक केली होती.”
आपली ऑनलाईन फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सईद यांनी पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
पवई पोलीस ठाण्याचे सायबर सेल तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर पिलाणे यांनी तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची माहिती मिळविली असता व्यवहार फ्लिपकार्ट पेमेंटवरून झाल्या असल्याचे निष्पन्न झाले. “मिळालेल्या माहितीच्या आधारे पिलाणे यांनी फ्लिपकार्ट नोडल अधिकारी यांना संपर्क करून गुन्ह्याची हकीकत समजावून सांगत तातडीने फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवरून झालेले ट्रान्सँक्शन फ्रीझ करण्याबाबत कळविले,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत यांनी सांगितले.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक गणेश पाटील (गुन्हे) यांनी सांगितले की, “तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्डवरून काढण्यात आलेली संपूर्ण रक्कम परत मिळवून त्यांच्या खात्यात परत करण्यात आली आहे.”
No comments yet.