हिरानंदानी गार्डन्स, पवई मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमधील एक अशी लोकवस्ती आहे. मात्र येथील काही रोडच्या दुरावस्था होत वर्षानुवर्ष ठीक होत नसल्याने येथील नागरिकांच्यात नाराजीचे सूर होते. मात्र आता या रोड्सना नवसंजीवनी मिळणार असून, रविवारी दुरावस्थेत असलेल्या येथील दोन रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचा नारळ फुटला आहे.
सेन्ट्रल एवेन्यू आणि क्लिफ एवेन्यू मार्गावर हे सिमेंटीकरणाचे काम करण्यात येणार असून, स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या कामाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी स्थानिक रहिवासी सुदिप्ता लाहीरी, शिवसेना शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, उप शाखाप्रमुख धनेश जाधव, शिवसैनिक आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उंच उंच इमारती, मोकळे सुसज्ज रस्ते, नागरिकांसाठी आवश्यक सर्व नागरी सुविधा या गोष्टींमुळे हिरानंदानी, पवई मुंबईकरांसाठी नेहमीच एक खास आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. विविध क्षेत्रातील लोकांसाठी घर निवडताना हे पहिले हक्काचे ठिकाण असण्यासोबतच चित्रपट सृष्टीला देखिल या परिसराचे वेड लागलेले आहे. आजपर्यंत शेकडो चित्रपटांचे चित्रीकरण याच हिरानंदानीमध्ये झाले आहे, आणि आजही सुरु असते. मात्र पाठीमागील काही दिवसात येथील काही भागाला उतरती कळा लागल्याची चिन्हे दिसत आहेत.
यातील दिवसेंदिवस वाढत चाललेली सर्वात मोठी समस्या म्हणजे क्लिफ एवेन्युवरील काही भागात पेवर ब्लॉक उखडून रस्ते खड्डेमय झाले आहेत. अनेक भागात पेवरब्लॉक रस्ता धसला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना हिरानंदानीसारख्या परिसरातून देखील खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिक यांच्यासह ‘आवर्तन पवई’ने विकासक यांचे कार्यालय आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष वेधत या रस्त्याच्या पुनर्निर्मितीची मागणी केली होती. याचीच दखल घेत स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या फंडातून रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
क्लिफ एवेन्यूवरील लेक कॅसल चौक ते सिल्वर ओक इमारत या भागात तर सेन्ट्रल एवेन्यूवर मार्केट भाग असणारे सायप्रेस इमारतपासून ब्लू बेल पर्यंतचा भागात सिमेंटचा रस्ता बनवण्यात येणार आहे. काही दिवसातच टप्प्या टप्प्याने या कामाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना कंत्राटदाराने सांगितले.
“लेक कॅसल ते सिल्वर ओक पर्यंतच्या भागातील रस्ता जास्तच खराब अवस्थेत आहे. पावसाळ्यात यातील अनेक भागात मोठमोठे खड्डे पडले होते. अजूनही रस्ता काही दयनीय स्थितीतच आहे. या भागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण केल्याने लोकांचा मोठा त्रास कमी होण्यासोबतच हिरानंदानीत इतर ठिकाणी रस्त्यांवरून फिरताना जसा आनंद मिळतो तसाच आनंद या भागात देखील मिळेल,” असे यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “पालिका प्रशासन किंवा आमदार यांना विनंती आहे की, इतर परिसरात देखील रस्त्याच्या किनाऱ्यालगत असणारा पेवरब्लॉक उखडल्याने वाहने अर्ध रस्त्यावरच पार्क होत आहेत. या भागांची दुरुस्ती झाली तर वाहने रस्ता सोडून बाजूला उभी राहतील आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता मोकळा मिळेल.”
पवई विहार रोडचे सिमेंटीकरण
यावेळी आमदार लांडे यांच्या हस्ते पवई विहार येथील शंकर मंदिर पासून गोपाल शर्मा शाळेपर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. सोबतच याच परिसरात असणाऱ्या दुर्लक्षित आदि शंकराचार्य उद्यानाच्या दुरुस्तीच्या आणि सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात देखील करण्यात आली.
No comments yet.