आयआयटी पवई येथील चैतन्यनगर भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम संपले नाही की, मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुन्हा खोदकाम केल्याने येथील नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रतिनिधीना तक्रार करूनही ते याकडे काना डोळा करत असल्याचा आरोपही येथील नागरिक करत आहेत.
जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून गटार साफसफाई, पाण्याची पाईपलाईन टाकणे आणि मलनिसारण वाहिनी टाकणे अशी विविध कामे चैतन्यनगर भागात सुरु असल्यामुळे येथील येण्याजाण्यासाठी असणारे रस्ते हे सतत खोदलेल्या अवस्थेत असतात, त्यामुळे येथील नागरिकांचे घरातून बाहेर निघणे किंवा घराकडे जाणे मुश्कील झाल्यामुळे नागरिकांचा त्रास वाढत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी महिन्यात येथील गटार साफसफाईच्या कामानंतर निघालेला मलबा आणि कचरा हा येथेच रस्त्यावर पडून होता, त्यामुळे नागरिकांना विशेषतः मोटारसायकल चालकांना ये-जा करणे अवघड झाले होते. याबाबत आवर्तन पवईने पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर तो हटवण्यात आला होता. पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करून पुन्हा येथील परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळा निर्माण झाला होता. आता ते काम संपले-न-संपले की लगेच खासदार फंडातून मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
‘कोणतीही पूर्व कल्पना दिल्या शिवाय हे काम सुरु करून खोदकाम करण्यात आल्यामुळे अनेक वृद्ध आणि आजारी नागरिक घरातच अडकून पडले आहेत. याबाबत कल्पना मिळाली असती तर किमान त्यांना बाहेर कुठेतरी हलवता आले असते. त्यांना आता घरातच खितपत पडावे लागले आहे’, असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक आणि युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष वीरेंद्र धिवार यांनी सांगितले.
आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक नगरसेवकांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नाहीत. त्यांच्या एका निकटवर्तीय कार्यकर्त्याने याबाबत बोलताना ‘चांगले काम करायचे म्हणजे त्रास तर होणारच ना!’ असे सांगितले.
ठेकेदार विद्याधर येवले यांनी सुद्धा ‘काम करायचे म्हणजे लोकांना त्रास होणारच, त्यांना ते सहन करायला हवे’ असा प्रतिनिधींचाच सूर आळवला.
‘पालिकेने दिलेल्या निर्देशानुसार २८ मे पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, मात्र हे काम अजूनही २० दिवस चालणार असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. म्हणजे हा पावसाळा आम्हाला चिखलातूनच मार्ग काढत चालावे लागणार, असे यासंदर्भात बोलताना महेंद्र उघडे यांनी सांगितले.
प्रतिनिधी रमेश कांबळे यांच्या माहितीवरून
No comments yet.