शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर काल, शनिवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, या मार्गाने हिरानंदानीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे हिरानंदानीकडे वळवण्यात आली आहे. या मार्ग बदलामुळे या निमुळत्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काम वेळेत आणि चांगल्या पद्दतीने होण्यासोबतच या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी आवश्यकता नसल्यास या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
मुंबईच्या अनेक भागात पालिकांतर्गत येणाऱ्या सुविधाच्या पावसाळापूर्व कामांना वेग आला आहे. पर्जन्यवाहिनी, गटारे यात कचरा अडकून पडणे किंवा त्यांची सोय नसणे, उखडलेले रस्ते, खड्डे पडलेले रस्ते यामुळे पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागात मुंबईकरांना संपूर्ण पावसाळा डबक्यातच काढावा लागतो. पवईत सुद्धा ठिकठिकाणी पालिका, सेन्ट्रल एजेन्सीतर्फे गटारे, रस्ते निर्मितीची कामे सुरु आहेत. चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा एसएमशेट्टी शाळेमार्गे येणारा रस्ता हा सगळ्यात मोठा दुवा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि याचीच दखल घेत यावर्षी या रस्त्याला प्रमुख्य देण्यात आले असून, येथे गटर आणि रस्ते निर्मितीच्या कामाला एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे.
पाठीमागील महिनाभरापासून येथे गटर निर्मितीचे सुरु असणारे काम पूर्णत्वाला आले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटारांना हिरानंदानी आणि शिवभगतानी येथील मुख्य गटारांना जोडण्यात आले आहे. शनिवारपासून आता या भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी याचे जास्तीत जास्त काम संपवण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न असणार आहे.
सुरुवातीच्या भागात शाळेच्या समोरील भागात हे काम सुरु झाले असल्याने म्हाडा कॉलोनीकडून हिरानंदानीकडे जाणाऱ्या मार्गाला बंद करण्यात आले आहे. या बदल्यात सरळ म्हाडा मार्गे जलवायू विहारच्या पाठीमागील बाजूने प्रथमेश कॉम्प्लेक्स येथे ऑर्चड एव्हेन्यूमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. हिरानंदानीकडून येणाऱ्या वाहनांना सुद्धा एसएम शेट्टी शाळेजवळ प्रवेश बंद करण्यात आला असून, रिज रोड मार्गे जलवायूजवळ येवून ऑर्चड एव्हेन्यूमार्गे जलवायुच्या पाठीमागील म्हाडा रस्ता मार्गे किंवा पवई विहार – लेकहोम मार्गे वाहने चांदिवलीकडे येवू शकणार आहेत.
म्हाडा किंवा पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्स भागात राहणाऱ्या रहिवाशांना लेकहोम मार्गे फिरून येणे लांबचे पडणार असल्याने त्यांना म्हाडा रस्त्याचा वापर करणे योग्य ठरणारे आहे. जे पाहता रस्त्याचे काम संपुष्टात येईपर्यत चांदिवली आणि इतर भागातून येणाऱ्या किंवा या भागात जाणाऱ्या वाहनांनी डीपी रोड ९ किंवा लेकहोम मार्गाचा वापर करण्याचा पर्याय सुचवण्यात येत आहे.
म्हाडा कॉलोनी ते आयआयटी स्टाफ कॉटर्स येथील रस्ता निर्मितीच्या कामावेळी वाहतुकीमुळे अधिक जास्त अडथळे निर्माण होणार असून, एका वेळी केवळ एकाच मार्गावर काम चालू ठेवून दुसऱ्या बाजूला एकेरी मार्गाने वाहतूक सुरु ठेवावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
No comments yet.