देशभर थैमान घातलेल्या कोरोना (corona) महामारीच्या काळात हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) कर्तव्य बजावत कोरोना प्रसार नियंत्रण आणण्यासाठी जीवाचे रान करणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे (ACP Ramesh Nangare) यांचे हृद्यविकाराने निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग म्हणून पदभार सांभाळला होता. गुरुवारी सकाळी ही बातमी पोलीस खात्यात समजताच एक चांगला अधिकारी गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोना काळात त्यांनी निभावलेल्या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रमेश नांगरे यांच्या कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या कामाबद्दल सत्कार केला होता. जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद घेण्यात आली होती. नांगरे यांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
“नांगरे साहेब यांनी २ दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. गुरुवारी रात्री ते परिसरात नाईट राउंड करून घरी परतले होते. आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झालं. नांगरे यांच्या निधनामुळे पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने पोलीस खात्याला मोठा धक्का बसला आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
मुंबईत विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावल्यानंतर काही महिन्यापूर्वीच त्यांनी साकीनाका विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. साकीनाका आणि पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा आणि मार्गदर्शन करत त्यांनी परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठी पाऊले उचलली होती. कायदा व सुव्यस्था राखण्यासोबतच नशाखोरी, वाहतूक कोंडी सारख्या आपल्या विभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरु केली होती. खूप कमी काळात त्यांनी या परिसरात आपली एक छाप निर्माण करत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या या अचानक जाण्याने पवई, साकीनाका परिसरातील नागरिकांकडून सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.