म्हाडाची स्वस्त सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ३० लाखांची फसवणूक

एका खासगी बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याच एका मित्राने ३० लाखांला गंडा घातला आहे. पवई येथे बाजारभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ८५ लाख रुपयांमध्ये ९७० चौरस फूट फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी मित्राला ३७ लाख रुपये दिले असून, उर्वरित रक्कमेसाठी कर्ज घ्यायचे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपले पती आणि मुलांसह पवई येथे राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या पतीचा मित्र के पुजारी त्यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी पवई येथे ९७० स्क्वेअर फुटांचा म्हाडाचा फ्लॅट फक्त ₹८५ लाखात मिळवून देतो असे सांगितले.

आपली म्हाडात चांगला संपर्क आणि ओळख असून, कमी भावात हा फ्लॅट मिळत असल्याचे सांगत मित्राने पटकन कुटुंबाचा विश्वास संपादन केला. बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीत चांगला फ्लॅट मिळत असल्याच्या विचाराने कुटुंब आरोपीच्या जाळ्यात अडकले. यासाठी पुजारीने तक्रारदार यांच्या पतीला ३७ लाख रुपयांचा हप्ता डीडीद्वारे भरण्यास सांगत उर्वरित रक्कमेसाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा सल्ला दिला.

“तक्रारदाराच्या पतीने २०२२ मध्ये १९.५० आणि १७.५० लाख रुपयांचे दोन डीडी तयार करून पुजारीला दिले. काही दिवसांनी पुजारीने ३७ लाख रुपयांची म्हाडाची (बनावट) पावतीही दिली. मात्र पुढे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया आणि इतर कामाच्या वेळेस आरोपीने तक्रारदार आणि त्यांच्या पतीचे फोन कॉल टाळण्यास सुरुवात केली,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी फोन उचलत नसल्याने तक्रारदार यांच्या पतीने म्हाडा कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, त्यांना देण्यात आलेली पावती बनावट असल्याचे समजले. यामुळे आपली फसवणूक झाली असल्याने त्यांनी आरोपीकडे त्वरित सर्व रक्कम परत करण्याची मागणी केली. ज्यानंतर जवळपास वर्षभरानंतर आरोपींनी ७ लाख रुपये परत केले परंतु, ३० लाख रुपये देण्यास तो सतत टाळाटाळ करत असल्याने ज्येष्ठ नागरिकाने पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चौकशी अंती पवई पोलिसांनी पुजारी आणि त्याचा अजून एक साथीदार एस कांबळे या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!