पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत प्रचार सभेसाठी यावे. त्यांची सभा झाली तरी मुंबईत शिवसेनाच कशी जिंकते हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे, असे थेट आव्हान मोदींना देत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर निशाना साधला आहे. सोमवारी चांदिवली येथे आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
पालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असून, विविध पक्षाच्या श्रेष्ठींच्या सभा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेची अशीच एक प्रचार सभा सोमवारी चांदिवलीत पार पडली. या सभेत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांचा खरपूस समाचार घेतला. मोदी हे फक्त घोषणाच करतात, तर अधिवेशन आणि जनता यांच्यासमोर वेगवेगळे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करायला हवा, अशा परखड शब्दात त्यांनी भाजपवर तोफ डागली.
भाजपने अनेकांची फसवणूक केली आहे. कोणाची औकात काय आहे हे आमचे शिवसैनिक होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात दाखवून देतील, असे खडे बोल सुद्धा त्यांनी यावेळी ऐकवले.
मुंबईला भाडोत्री माणसांची नव्हे तर आपल्या माणसांची गरज आहे. कुणाचीही दुकाने चालवण्यासाठी शिवसेना मुंबईकरांना विस्थापित होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विकासाची भाषा आम्हाला समजते, आम्ही त्याचा कधीच विरोध केला नाही. मात्र, आम्ही भूमिपुत्रांना उध्वस्त करू देणार नाही. केंद्रात आणि राज्यात तुम्हीच आहात, मुंबईची सत्ता तुम्हाला देवून बाकीच्यांनी काय धुणीभांडी करायची काय? आमची मुंबई आम्ही कोणालाही ओरबाडू देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मोदींनी बिहार निवडणुकीच्या वेळीही विविध पॅकेज दिली होती, पण लालूप्रसादांनी चोख प्रतिउत्तर दिले. बिहारमध्ये काय झाले? तेच मुंबईत होणार, पंतप्रधानांच्या सभेनंतरही मुंबईत शिवसेनाच येणार.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.