पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले होते. पुराव्याच्या आधारावर पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपीने हे अत्यंत गंभीर कृत्य केल्याची कबुली दिली. आपल्या अजून एक मित्रासोबत तो यापूर्वीही अशाच एका कृत्यात सहभागी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पवईतील विविध भागात असणाऱ्या भटक्या जनावरांना अन्न, औषध पुरवणाऱ्या देवी शेठ यांना हिरानंदानी येथील गलेरिया मॉलमध्ये गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी नुरी जखमी अवस्थेत मिळून आली होती. तिच्या खाजगी भागातून रक्तस्त्राव होत असल्याने, त्यांच्या सहकारी निहारिका गांधी यांच्यासोबत बॉम्बे अनिमल राईटस संस्थेच्या मदतीने त्यांनी नुरीला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिच्या खाजगी भागातून एक लाकडी पट्टी बाहेर काढली होती.
संस्थेचे गीतेन दुधानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलीस गुन्हा नोंद करून याचा तपास करत होती.
“सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता पुराव्याच्या आधारावर आम्ही त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने हे अत्यंत गंभीर कृत्य केल्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच दुकाने बंद असल्याने मूळचा पश्चिम बंगालचा असणारा प्रधान काम करत असणाऱ्या दुकानातच राहत होता. आसपासच्या परिसरात असणाऱ्या भटक्या जनावरांना खायला देण्यासोबतच त्यांना अंघोळ घालणे, कुरवाळणे अशी कामे करत असल्याने प्राण्यांशी त्याची मैत्री झाली होती. “अविवाहित असणाऱ्या प्रधान याने काही दिवसापूर्वी आपल्या उत्तेजना बदल बोलत कुठे सोय आहे? अशी विचारणा ही केली होती. आपल्या या भावनेतूनच त्याने हे कृत्य केले आहे, असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“आरोपी राहत असलेल्या ठिकाणावरून आम्हाला नुरीच्या शरीरातून काढलेल्या लाकडीशी मिळते-जुळते काठीचे तुकडे सुद्धा मिळून आले आहेत,” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार काळे यांनी सांगितले.
आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचेही दिसत आहे. आरोपीला हिंदी समजत नसल्याने भाषांतर करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने त्याची चौकशी करण्यात आली. त्याला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राण्यांशी अत्याचार करण्याच्या दुसऱ्या एका घटनेत तो सहकारी होता, असेही यावेळी बोलताना पोलिसांनी सांगितले.
याव्यतिरिक्त अजून काही घटनेत त्याचा सहभाग होता का? याचा पवई पोलीस शोध घेत आहेत.
No comments yet.