पवई, आयआयटी मार्केट जंक्शन येथे रस्ता ओलांडताना एका भरधाव टेंपोच्या धडकेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता घडली. प्रमिला सिंह असे मृत महिलेचं नाव असून, टेम्पो चालकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे.
प्रमिला, पती आणि चार मुलांसहीत सुर्यनगर परिसरात राहत होती. आपल्या इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या मुलाची टयूशनची फी भरण्यासाठी त्याच्या सोबत ती आयआयटी येथे आली होती. मुलाची फी भरून प्रमिला आणि तीचा मुलगा चालत घरी परतत असताना ही घटना घडली.
“आयआयटी मार्केट जंक्शनजवळ सिंग्नल लागल्यानंतर दोघेही रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी आदिशंकराचार्य मार्गावरून भरधाव वेगात धावणाऱ्या एमएच ०४ ईएल ८१५८ क्रमांकाचा टेंपोने प्रमिलाला जोरदार धडक दिल्यामुळे ती दूरवर जावून पडली.” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
डोक्याला जबर मार लागलेल्या अवस्थेत तिला स्थानिकांच्या मदतीने नजीकच्या महात्मा फूले रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
“आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेवून चालकास अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.