अंगावर गाडी घातल्याचा खोटा बहाणा करून एका कारचालकाला संगनमत करून जबरी लुटणाऱ्या ३ जणांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक तिन्ही आरोपी पवई परिसरातील रहिवाशी आहेत. यातील एक आरोपी अभिलेखावरील सराईत आरोपी असून, त्याला एक वर्षा करीता मुबंई, पालघर, ठाणे परिसरातून हद्दपार केले असताना त्याने हा गुन्हा केला आहे.
फिर्यादी हे हिरानंदानी, पवई येथील ‘जनरल मिल्स’ या कंपनीत चालक म्हणून काम करतात. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७.४५ वाजण्याच्या सुमारास कंपनीची एर्टीगा मोटार कारने फिल्टर पाडा, आरे रोड, पवई या ठिकाणी पोहचले असता, वाहतूकीच्या वर्दळीत अनोळखी तीन इसमांनी आपसात संगनमत करून पायावरून गाडीचे चाक गेले असल्याचा बनाव करून फिर्यादी यांना दमदाटी, शिवीगाळ करून त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता.
याबाबत फिर्यादी यांनी दिलेलेल्या तक्रारीवरून तीन अनोळखी इसमांचे वर्णन नोंद करुन भादवि कलम ३९२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे फरदीन उर्फ आमीन फिरदोस खान (वय २० वर्षे), सलमान उर्फ कालु अस्लम दिवडे, (वय ३१ वर्षे), समशेर उर्फ शेरू ख्वाजा खान (वय ३२ वर्षे) यांना ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
या संदर्भात अधिक बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड म्हणाले, “या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समशेर उर्फ शेरू ख्वाजा खान हा अभिलेखावरील सराईत आरोपी असून, त्याला एक वर्षा करीता मुबंई, पालघर, ठाणे परिसरातून हद्दपार करण्यात आले होते. दाखल गुन्ह्याचे कलमात सदर आरोपी विरुद्ध कलम १४२ म. पो. अधि. १९५१ अनव्ये वाढ करण्यात आली आहे.”
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे. “मुख्य आरोपीला मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून हद्दपार केलेले असतानाही तो पवई परिसरात येवून गुन्हे करत होता. पोलिसांपासून बचावासाठी तो आरे कॉलनी भागात झाडा झुडपात लपून बसत असे. रविवारी आमच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला आरे कॉलनी भागातून अटक केली आहे.” पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हारूगडे,
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकृष्ण हारूगडे, याच्या मार्गदर्शनखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक विनोद लाड व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी पार पाडली.
No comments yet.