अंधाराचा आणि निर्जन रस्त्यांचा फायदा घेवून रस्त्यावर जबरी चोरी करणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखा कक्ष ७ ने शिताफीने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत. फजल रेहमान नजिर अशरफी (वय ३३ वर्ष), राहणार डोंगरी, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरी केलेले अॅपल व वन प्लस कंपनीचे मोबाईल आणि अॅपल कंपनीचे घड्याळ हस्तगत केले आहे.
भांडूप येथे राहणारे फिर्यादी १२ डिसेंबरला पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास पत्नीसह बांद्रा टर्मिनस येथून रिक्षाने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पुर्व दृतगती मार्गावरून भांडुपच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्यांची रिक्षा पंतनगर उड्डाणपूल पार करून पुढे आल्यावर रस्त्यावर वाहने नसल्याचा फायदा घेवून एक अनोळखी मोटारसायकलस्वाराने उजव्या बाजूने येत फिर्यादी यांच्या पत्नीच्या हातातील हॅन्ड बॅग जबरदस्तीने खेचून पळ काढला. याबाबत फिर्यादी यांनी त्वरित विक्रोळी पोलीस ठाण्यात याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. विक्रोळी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२ नुसार नोंद गुन्ह्यात गुन्हे शाखा ७ समांतर तपास करत होते.
“तपासादरम्यान घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, दादर, डोंगरी तसेच मुलुंड टोल नाका या ठिकाणावरील साधारण १०० पेक्षा अधिक सिसिटीव्ही कॅमेरे आमच्या पथकाने तपासत गुन्ह्यातील मोटार सायकलचा नंबर तसेच आरोपीची ओळख निष्पन्न केली,” असे यासंदर्भात बोलताना महेश तावडे, प्रभारी पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष-७ यांनी सांगितले.
पथकातील पोलीस हवालदार अजय बल्लाळ आणि पोलीस नाईक प्रमोद जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला निशाणपाडा, डोंगरी येथून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपिताकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला असून, पोलिसांनी त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मालमत्ता – अॅपल कंपनीचा मोबाईल, वन प्लस कंपनीचा मोबाईल, अॅपल कंपनीचे घड्याळ तसेच गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची बर्गमॅन स्कुटर (एम.एच. ०१ ई.डी. ६००५) असा एकूण १,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीला पुढील तपासकामी जप्त मालमत्तेसह विक्रोळी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक उबाळे, पोलिस उपनिरीक्षक महेश शेलार, पोलिस उपनिरीक्षक परबळकर, पो. ह. अजय बल्लाळ, पो. ना. प्रमोद जाधव, पो.ह. बडगुजर, पो.ह. कांबळे, पो.ह. शिरापुरी, पो. ना. गलांडे, पो.शि. सय्यद पो शी होनमाने यांनी केली.
No comments yet.