नैराश्यग्रस्त किशोरवयीन मुलाने आपले जीवन संपवण्याचा विचार करून घर सोडल्याच्या २४ तासांपेक्षा कमी कालावधीत त्याला शोधून काढत परत आणले आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, १७ वर्षीय मुलाने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यानंतर पोलिसांनी विविध भागात शोधमोहीम राबवत त्याला शोधून काढले. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने तो नाराज होता आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले होते.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका भागात राहणारा १७ वर्षीय मुलगा दुपारच्या सुमारास घरातून गायब झाला होता. आईने आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता. संध्याकाळी त्याचे वडील कामावरून घरी आल्यावर चिंताग्रस्त आईने त्यांना मुलगा दुपारपासून घरी परतला नसल्याचे आणि मिळून येत नसल्याचे सांगितले.
“नीटचा निकाल आला असून, त्यात त्याला समाधानकारक गुण मिळाले नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले होते. ज्याबाबत त्याच्या वडिलांनी त्याला ठीक आहे आणि तो पुन्हा परीक्षा देवू शकतो असे सांगितले होते. मात्र तो नाराज होता,” असे पोलिसांनी सांगितले.
सुरुवातीला मुलगा नाराज असल्याने तो मित्रांसोबत बाहेर गेला असेल असे समजून आई-वडील वाट पाहत होते. पण रात्री उशिरा पर्यंत मुलगा परत न आल्याने त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
तपास सुरु असताना मुलाचा शोध घेत असणाऱ्या पथकाला मुलाने लिहलेली चिठ्ठी मिळून आली. ज्यात त्याने असे म्हटले होते की, तो पराभूत झाला असून, तो आत्महत्या करणार आहे.
साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पुरी आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज बकायगर नेतृत्व करत असलेल्या शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता तो मुलगा घरातून निघाल्यानंतर साकीनाका जंक्शनजवळ फिरताना आढळला होता.
पोलिस पथकाने साकीनाकासह आसपासच्या परिसरात, गल्ली बोळात त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर मेट्रो स्टेशन तपासत असताना जागृती नगर मेट्रो स्टेशनच्या खाली तो झोपलेला पोलिसांना मिळून आला.
साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे आणि पोलीस निरीक्षक दिनकर राऊत यांनी त्याचे जवळपास तासभर समुपदेशन केल्यानंतर त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
No comments yet.