काही काळाच्या विश्रांतीनंतर पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून चोरी करणारे चोरटे पवई मध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. गुरुवार, १७ ऑक्टोबरला हिरानंदानी येथे पार्क केलेल्या एका कारच्या काचा फोडून कारमधील बॅग चोरट्यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.
पवई, हिरानंदानी येथील मॅपल इमारतीत राहणारे संजयकुमार कुंबळे हे आयआयटी मुंबई येथे सिविल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. गुरुवारी संध्याकाळी कार्यालयीन कामकाज संपल्यावर कार्यालयात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवाळी भेटवस्तू खरेदीसाठी ते एक कर्मचारी श्वेता सोलंकी यांच्यासोबत हिरानंदानी येथे आले होते.
मी माझी स्कोर्पिओ कार क्रमांक एमएच ०३ ईएल ८५१६ हिरानंदानी येथील स्पेक्ट्रा इमारतीच्या गेटजवळ ८.१० वाजताच्या सुमारास पार्क करून सोलंकी यांच्यासोबत खरेदीसाठी गेलो. साधारण ८.४५ वाजण्याच्या सुमारास आम्ही परत आलो असता, गाडीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील मधल्या खिडकीची काच फुटली असल्याचे आढळून आले. दरवाजा उघडून आत पाहिले असता सोलंकी यांनी गाडीत ठेवलेली त्यांची सॅग (बॅग) गाडीत मिळून आली नाही. असे पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
“आम्ही तक्रारदार यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. बॅगमध्ये १६,००० रुपये कॅश, काही कागदपत्रे आणि बँकेचे एटीएम कार्ड होते. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असून, आरोपींचा शोध सुरु आहे,” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “गाडीत ठेवलेल्या बॅगमध्ये मौल्यवान वस्तू असल्याने चोरटे अशा गाड्यांच्या शोधातच असतात. म्हणूनच आम्ही अनेकदा नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू गाडीत सोडू नये किंवा सोडल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची विनंती करत असतो.”
ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारच्या गुन्ह्यात इराणी टोळीच्या सदस्यांचा सहभाग असण्याची शक्यता जास्त असते. या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.”
No comments yet.