व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पवई परिसरातून शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट १० ने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सुनील कुलकर्णी (४९), राहणार कोथरूड पुणे आणि अन्वर अब्दुल खुदुस शेख (५५) वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी ज्याची बाजारात किंमत ६ कोटी रुपये आहे, सह एक आय २० कार आणि २ मोबाईल हस्तगत केले आहेत.
व्हेल माशाची उलटी ही समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं. सुगंधित उत्पादने तसेच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत आहे. अनुसूची क्रमांक १ मधील संरक्षित प्राणी असणाऱ्या स्पर्म व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे. या व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण पवईतील आंबेडकर उद्यान परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १० चे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मेंधारपुरे यांना मिळाली होती.
वन अधिकारी देशपांडे, पांडूळे आणि कर्वे यांच्यासह संशयित इसम येणाऱ्या ठिकाणी सापळा रचून पाळत ठेवली असता, दोन इसम आय २० कारमध्ये संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसून आल्याने, त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत ब्रावनिश रंगाचे ७ तुकडे पोलिसांना मिळून आले. “त्यांच्याकडे त्या पदार्थाबाबत विचारणा केली असता ती व्हेल माशाची उलटी असून, पवई येथे विक्रीसाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी म्हणाले.
या कारवाईबद्दल पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी पुष्टी केली.
“आरोपींकडून ६ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी, ज्याची बाजारात किंमत ६ कोटी रुपये आहे, सह एक कार हस्तगत करण्यात आली आहे,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक पूजा कल्याणी यांनी सांगितले.
‘अटक आरोपींनी हे कुठून आणले होते आणि पवईत ते कोणाला विकणार होते याबाबत आम्ही आरोपींकडे चौकशी करत आहोत, असेही याबाबत बोलताना वपोनि सोनावणे म्हणाले.
या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.
का आहे बाजारात एवढी किंमत?
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस या पदार्थाचा वापर अत्तर किंवा सुगंधित उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. हे अत्तर लाखोंच्या किंमतीनं विकले जाते. अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. तर, काही देशांमध्ये याचा वापर सुगंधित सिगरेट तयार करण्यासाठी सुद्धा होतो.
No comments yet.