सेन्ट्रल एजेन्सीच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली या दोन भागांना जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर रोड निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम मार्गावर असतानाच काही अतिउत्साही नागरिकांनी यासाठी लावलेले बॅरिकेड हटवत वाहतूक सुरु केली आहे. मात्र रस्ता पूर्ण तयार नसून, यामुळे रस्ता खराब होण्याची शक्यता पालिका रोड विभागाकडून व्यक्त होत आहे.
मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने सेन्ट्रल एजन्सीच्या माध्यमातून सुरु आहेत. पवईत सुद्धा अनेक ठिकाणी अशाच प्रकारे रस्ता आणि गटार निर्मितीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील हिरानंदानी आणि चांदिवली भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा असणाऱ्या एस एम शेट्टी शाळा मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे काम सुद्धा शनिवार, ११ मेपासून सुरु करण्यात आले होते.
जवळपास १ वर्षाचे कंत्राट असणाऱ्या या कामामध्ये रस्ता निर्मिती आणि गटार निर्मिती अशा दोन्ही कामांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात सुरु झालेल्या या कामानुसार रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटाराच्या पुनर्निर्मितीचे काम कंत्राटदाराने पूर्ण केल्यानंतर शाळेच्या समोरील जलवायू कॉर्नर ते म्हाडा इमारत या भागातील रस्त्याचे काम ११ मे रोजी सुरु केले होते. यासाठी म्हाडा मार्गे जलवायू विहारच्या पाठीमागील बाजूने प्रथमेश कॉम्प्लेक्सकडून ऑर्चड एव्हेन्यूकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. या भागातील सिमेंटीकरणाचे काम जवळपास संपुष्टात आले असतानाच शनिवारी काही उत्साही नागरिकांनी यासाठी केलेले बॅरिकेडिंग हटवत वाहतूक सुरु केली.
“रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम संपले आहे. रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आलेल्या पॅचेसमध्ये साफसफाई करून डांबर भरण्याचे काम सुरु असतानाच कोणीतरी बॅरिकेड हटवल्याने संपूर्ण वाहतूक या रस्त्यावरून सुरु झाली आहे” असे याबाबत बोलताना तेथे कार्यरत असणाऱ्या कामगारांनी सांगितले.
“आम्ही सदर काम पूर्ण करून लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करणार होतो, मात्र लोकांनी वाहतूक सुरु केल्याने कामात अडथळा निर्माण झाला आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
याबाबत वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “रात्रीच्या वेळेस कोणीतरी बॅरिकेड हटवून वाहतूक सुरु केली आहे. आम्ही परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे नंबर मिळवले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पाठवले आहे.”
परिसरात सुरु असणारी कामे ही नागरिकांच्या सुविधेसाठीच आहेत. त्यामुळे काही काळ त्रास नक्की जाणवेल, मात्र अशा प्रकारच्या कृत्यांमुळे काम आणखी वाढून त्याचा काळ वाढू शकतो. तेव्हा नागरिकांनी अशा कार्यांना सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक प्रतिनिधीच्याकडून करण्यात येत आहे.
No comments yet.