संपूर्ण मुंबईत २२ आणि २३ डिसेंबरला १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे ही पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिकातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ‘एन’ व ‘एल’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील असे जल अभियंता विभागाने कळवले असून, एल विभागात चांदिवली येथील संघर्षनगर आणि खैरानी रोड परिसराचा यात समावेश आहे.
नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रसानातर्फे मुंबईकरांना करण्यात आले आहे.
यासंदर्भात पालिकेतर्फे एक वार्तापत्र जाहीर करण्यात आले आहे. या वर्तापत्रानुसार, पाणीपुरवठा करणाऱ्या २७५० मिलीमीटर व्यासाच्या ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
काही ठिकाणी पूर्णत: कपात
‘एन’ विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी कप्पा १ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. मंगळवार २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० पासून बुधवार, २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ‘एन’ व ‘एल’ दोन्ही विभागातील काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. मुंबईकरांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
एल विभागातील या भागात पूर्णतः पुरवठा बंद
प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४मधील संघर्षनगर, खैराणी रोड, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
No comments yet.