पवईमधील आयआयटी कॅम्पसमधून जाणारी पालिकेची मोठी जलवाहिनी आज (मंगळवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फुटली. पालिका अधिकारी तिथे पोहचून काम सुरु होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आधीच मुंबईत पाण्याची कपात सुरु असताना अशी घटना मुंबईकरांच्या संतापाचे कारण ठरले.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या दरम्यान आयआयटीच्या कॅम्पस भागातून जाणारी पालिकेची भलीमोठी जलवाहिनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी फुटली. याबाबत स्थानिकांनी पालिका प्रशासनाला माहिती दिल्यानंतर काही तासाने या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पोहचले. पाईप लाईन फुटलेल्या ठिकाणी पाण्याचा दबाव इतका जास्त होता कि, पाण्याचे मोठे फवारे दुरुन दिसत होते.
मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत असल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पवई विभागात सुरु असलेली पाणी टंचाई आणि त्यातच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये संताप होता. अखेर पाच तासानंतर संध्याकाळी सहा वाजता या जलवाहिनी दुरुस्तीचे काम संपवण्यात पालिकेला यश आले.
‘आयआयटीमधील हॉस्टेल क्रमांक चारच्या मागच्या बाजूला पालिकेची पाईपलाईन आहे. ती आज दुपारी अचानक फुटल्याचे समजताच मी व माझ्या टिमने घटनास्थळी धाव घेत पालिका कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पाईपलाईन दुरूस्त झाली असून, याचा फटका कोणालाच बसलेला नाही, सर्वत्र पाणी सुरळीत सुरू होते’ – चंद्रावती मोरे, नगरसेविका (वॉर्ड १२१)
No comments yet.