हिरानंदानी आणि चांदिवलीला जोडणारा एक नवीन ६० फुटी रोड स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी पवई येथील विकास कामाच्या उद्घाटनावेळी घोषित केले होते. या रोडच्या प्राथमिक कामाची सुरुवात सुद्धा झाली होती. मात्र पाठीमागील काही महिन्यांपासून या रोडवरील काम बंद दिसत असून, हा रोड अडकला कुठे? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. या दोन विभागांना जोडण्यासाठी पंचश्रुष्टी आणि जेविएलआर, रामबाग मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र यातील पंचश्रुष्टी मार्गावर खराब रस्त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते, तर जेविएलआर, रामबाग मार्गे फिरून जाणे खूप लांब पल्ल्याचे पडते. अशात या परिसरात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांसाठी चांदिवली – हिरानंदानी मार्गाची निर्मिती केली जात असल्याचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडून सांगण्यात आले होते.
पवई आणि चांदिवली परिसराचा दिवसेंदिवस होणारा विकास पाहता या परिसराला जोडणाऱ्या मार्गिकेची गरज गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना जाणवत होती. त्यातच चांदिवलीत पाठीमागील काही महिन्यात आलेल्या नवनवीन रहिवाशी इमारती आणि काम सुरु असणाऱ्या रहिवाशी संकुलांची गरज पाहता या परिसराला पर्यायी मार्गाची अत्यंत आवश्यकता जाणवत आहे. पंचश्रुष्टी मार्गावर वाहतुकीच्या दबावामुळे वाहतूक कोंडी निर्माण होवून, याचा परिणाम चांदिवली आणि हिरानंदानी परिसरातील इतर मार्गांवर सुद्धा पडत असतो. बृहन्मुंबई महानगरपालिका विकास आराखड्यात पर्यायी मार्गाची तरतूद दाखवण्यात आली असतानाही गेली अनेक वर्ष मंजुरीच्या विळख्यात तो अडकून पडलेला होता. अखेर स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी पाठपुरावा करत पालिकेतर्फे या पर्यायी रस्त्याची मंजुरी मिळवली आहे.
चांदिवली आणि हिरानंदानी या दोन परिसराला जोडणाऱ्या ६० फुटी हा मार्ग असणार आहे. खैरानी रोड येथून येणारा हा मार्ग डी-मार्ट येथून, विसिनिया (शापूरजी पालूनजी), संघर्षनगर जामा मश्जीद, पवार पब्लिक स्कूल मार्गे हिरानंदानी परिसराला जोडणार आहे.
चांदिवली येथील डी-मार्ट येथून फेब्रुवारी २०२१ला या कामाची सुरुवात झाली होती. शापूरजी पालूनजी यांच्या विसिनिया प्रोजेक्ट पर्यंत रस्त्याच्या खोदकामाचे काम पूर्ण झाले होते. तसेच हिरानंदानी एसईझेडकडून हिरानंदानी न्यू स्कूलजवळ रस्ता खोदकाम पूर्ण झाले आहे. मात्र उरलेल्या भागात अजूनही काहीच काम दिसत नसल्याने नक्की हा रोड अडकला कुठे? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खाजगी जागा मालकांनी आपल्या जागेतून जाणाऱ्या या मार्गाला काढण्यास अजून अनुमती दिली नसल्याने हा रस्ता पुढे सरकत नसल्याचे समोर येत आहे.
“माझा सतत पाठपुरावा सुरु आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी टेंडर काढण्यात आले आहेत. लवकरच पालिकेतर्फे काम सुरु होईल. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी याला अडवणूक केली आहे त्यांना अनुमती देणे भागच असेल,” असे यासंदर्भात बोलताना आमदार लांडे म्हणाले.
No comments yet.