पवई तलाव वाचवण्यासाठी युथ पॉवर सरसावले

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मानवी साखळीतून केली जनजागृती

रविराज शिंदे

youth power save powai lake2‘भ्रष्टाचाराचा बोलबाला, पवई तलावाचा नाला केला’ ‘दुर्लक्ष कोणाचे? लोकप्रतिनिधींचे, पालिका प्रशासनाचे’ या घोषणांनी रविवारच्या सकाळी पवई तलाव परिसर निनादला. पवई तलावात पावसाचे पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांमधून येथील वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. तलावाची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी व नैसर्गिक अस्तित्व राखण्यासाठी ‘युथ पॉवर’ संघटनेने पुढे येत ४ जूनला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत तलाव बचाव मोहिमे अंतर्गत जनजागृती आणि मानवी साखळीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक परदेशी नागरिकांनी सुद्धा या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.

५२० एकर परिसरात आणि जवळपास ३९ फूट खोल असणाऱ्या पवई तलावाची निर्मिती ही मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने केली गेली होती; मात्र पाण्यात असणाऱ्या जलपर्णी आणि जलप्रदूषणामुळे पाणी पुरवठा बंद करून १८९० मध्ये तलाव पश्चिम भारत मासेमारी संघटनेला भाडेतत्वावर देण्यात आला आणि पुढे महाराष्ट्र मासेमारी संघटनेला याची जबाबदारी सोपवण्यात आली.

youth power save powai lake0000गेल्या दशकात पवई परिसरात झालेला विकास आणि पवई तलावात येणाऱ्या मुंबईकरांची गर्दी पाहता पवई तलावाला पर्यटन स्थळ म्हणून स्थान मिळाले. तलावाच्या सौंदर्यात अजून भर घालण्यासाठी पालिकेतर्फे करोडो रुपये खर्चून पवई तलाव सुशोभिकरण केले गेले आहे. मात्र दुसरीकडे तलावात प्रदूषित, घाण, गटाराचे पाणी सोडून नैसर्गिक संपत्तीस नुकसान पोहचवले जात आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना युथ पॉवर मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र धीवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सांडपाणी सोडल्याने यातील जैव विविधता तर संकटात आलीच आहे, मात्र या तलावाचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे. मुळात काय घडतेय आणि त्याचे दुष्परिणाम काय हेच माहित नसल्याने अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ही केवळ पवईची नव्हे तर संपूर्ण मुंबईची समस्या आहे. यासाठी जनतेमध्ये जनजागृती आवश्यक असल्याने आमच्या संघटनेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तलावाच्या बचाव आणि जतनीकरणासाठी मानवी साखळीचे आयोजन करून लोकांच्यात जनजागृती केली गेली.

“जेव्हा जेव्हा मुंबईला पाण्याचा तुटवडा जाणवला तेव्हा कृत्रिम पावसाच्या पर्यायासह पवई तलावाचे पाणी पुनर्जिवित करण्याचे बोलण्यात आल्याचे कित्येकदा ऐकले, मात्र तसे कधीच झाले नाही. या दुर्लक्षाचा फायदा घेतच धनदांडग्यांनी तलावात सांडपाणी सोडण्याचे धाडस केले आहे” असे संस्थेचे विद्यानंद काकडे यांनी सांगितले.

आवर्तन पवई आणि पॉज मुंबईच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ‘पवई तलाव बचाव’ मोहिमेला आता मोठे स्वरूप प्राप्त होत असून, युथ पॉवरच्या माध्यमातून अजून एक कडी त्यात जोडली गेली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!