साकीनाका परिसरात ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; मारहाण

प्रातिनिधिक छायाचित्र

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित महिलेची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर स्थानिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

“गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला साकीनाका खैरानी रोड येथे मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे रात्रपाळी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एका टेम्पोमध्ये गंभीर जखमी अवस्थेत महिला आढळून आली. तिला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली,” असे याबाबत बोलताना परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने ४२ वर्षीय मोहन चौहान नामक व्यक्तीला गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तातडीने एका आरोपीला अटक केली असून, प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!