दोन वर्षापूर्वी जापानी नागरिकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

मुंबईत कामानिमित्त आलेल्या एका जापानी नागरिकाला पवई येथे परतत असताना लुटण्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक राशीद फारूक मुजावर शेख उर्फ पापड याला गुन्हा घडल्याच्या दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एक चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय जापानी नागरिक आणि इंजिनिअर असणारे अकीरा शिगेता एका कराराच्या संदर्भात मुंबईत आले होते. २४ एप्रिल २०१६ रोजी शिगेता यांनी घाटकोपर येथील आरमॉलमध्ये खरेदी करून ते राहत असणाऱ्या पवई, हिरानंदानी येथे येण्यासाठी त्यांनी तेथून एक रिक्षा पकडली होती.

हिरानंदानी जवळ आले असताना रिक्षाचा मीटर चालू नसल्याचे शिगेता यांच्या लक्षात येताच त्यांनी रिक्षाचालकाला याबाबत माहिती दिली. मात्र रिक्षाचालकाने उर्मठपणे बोलत मोडक्या-तोडक्या इंग्रजीत त्याच्याकडे ५० डॉलरची मागणी करून, भरधाव वेगात रिक्षा पळवायला सुरुवात केली, असे त्यानी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

घाबरलेल्या शिगेता यांनी रिक्षाचालकाच्या दिशेने ५०० रुपये फेकून चालत्या रिक्षातून उडी मारून पळ काढला. पार्कसाईट पोलीस ठाण्यात जावून त्यानी दिलेल्या जवाबाच्या आधारावर पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता, मात्र आरोपी रिक्षा चालक मिळून आला नव्हता.

“आम्ही वाहनातून चोरी करणाऱ्या आरोपींच्या शोधात असताना काही संशयित वाहन चालकांना ताब्यात घेतले होते. घाटकोपर येथे राहणाऱ्या रशीद मुजावरची चौकशी करत असताना त्याने या गुन्ह्यात शामिल असल्याची कबुली दिली. सोबतच त्याने मोबाईलच्या दुकानातून दोन मोबाईल चोरी केले असल्याची कबुली सुद्धा दिली असल्याचे याबाबत बोलताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपीला ड्रगचे व्यसन असून, पुढील तपास करण्यासाठी त्याला पार्कसाईट पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes