तरुणीचा पाठलाग करून विनयभंग, तरुणाला अटक

चांदिवली, संघर्षनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तरुणाने तिचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार साकीनाका परिसरात गुरुवारी घडला. नावेद इकबाल शेख (२०) असे तरुणाचे नाव असून, साकीनाका पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता ११ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला चांदिवलीतील संघर्षनगर येथे आपल्या माहेरील घरी राहते. तिचा पती दारूच्या व्यसनाच्या पूर्ण आहारी गेल्याने दोघांच्यात होणाऱ्या भांडणाला आणि मारहाणीला कंटाळून तरुणीने दहा वर्षांपूर्वीच त्याचे घर सोडले. सध्या ती आपल्या माहेरी परिवारासोबत राहते. आपला पोटापाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून साकीनाका येथील एका ब्युटीपार्लरमध्ये ती काम करते.

परिसरातच राहणाऱ्या नावेद सोबत तक्रारदार महिलेचे मैत्रीचे संबंध होते, मात्र हे संबंध तिच्या घरच्यांना आवडत नसल्याने तिने नावेदपासून दूर राहणेच पसंत केले होते. नावेद सतत पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. गुरुवारी सुद्धा नावेदने पाठलाग करून ती साकीनाका येथील कामाच्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी तिला गाठून बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. याचा राग आल्याने नावेदने तिच्या बाबतीत अश्लील बोलत मारहाण करत तिचा भर रस्त्यातच विनयभंग केला.

याबाबत तिने आपले नातेवाईक आणि कामाच्या ठिकाणी माहिती देताच त्यांनी तिच्यासह जावून साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साकीनाका पोलिसांनी नावेदला अटक करून अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes