जेवीएलआरवर पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) पवई प्लाझा येथे झालेल्या अपघातात कचऱ्याच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याच्या घटनेला २ दिवस झाले नसतील की सोमवार, १७ जानेवारीला याच मार्गावर झालेल्या अजून एक अपघातात ५५ वर्षीय पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत हलगर्जीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल खाजगी बस चालक रामबाबू दास (३६) याला अटक केली आहे.

“चांदिवली येथील संघर्षनगरमध्ये राहणारे अच्छेलाला चंद्रबली प्रजापती (५५) हे आपले काम संपवून दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वसईवरून आपल्या स्कुटीवरून चांदिवली येथील आपल्या घरी परतत होते. “ते जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड मार्गे मिलिंदनगर, तिवारी कंपाऊंड येथे पोहचलेच होते की, याच मार्गावरून त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या खाजगी बस एमएच ०४ जेयू ९१३९ने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक मारली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “बसची धडक एवढ्या जोरात होती की, प्रजापती हे गाडीसोबत रस्त्यावर घसरत गेले. या संपूर्ण घटनेत त्याच्या कमरेच्या खालील भागाला गंभीर दुखापत झाली होती.”

“जखमीला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मण यादव यांनी सांगितले.

पवई पोलिसांनी भादवि कलम २७९ (निष्काळजीपणे / हयगयीने वाहन चालवणे) ३०४-अ (निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे) सह मोटर वाहन कायदा कलम १३४ (जखमीला वैद्यकीय मदत न करता, घटनेची माहिती न देता पळून जाणे) गुन्हा नोंद करत बस चालकाला गुन्ह्यात अटक केली आहे.

, , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: