शरली उदयकुमार यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे दिला जाणारा २०२२ – २०२३चा गुणवंत शिक्षक पुरस्कार पवई इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या शरली उदयकुमार यांना देण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उदयकुमार यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी कार्यक्रमासाठी कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, मा. शि. आ. भगवानराव साळुंखे, मा. शि. आ. नागो पुंडलिक गाणार, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवनाथ दराडे (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह), अध्यक्ष उल्हास वडोदकर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन मुंबई येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे ११ फेब्रुवारीला पार पडले. यावेळी शिक्षकांच्या संबंधित विविध विषयावर चर्चा घडली. सोबतच २०२२ – २०२३ या काळात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी पवई इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या शरली उदयकुमार यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

उदयकुमार या पाठीमागील ३५ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात अविरत काम करत आहेत. मुलांमध्ये शिक्षणासोबत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्या सदा कार्यरत असतात. गरीब गरजू मुलांसाठी काहीतरी करण्याची ओढ कायम त्यांच्यात पाहायला मिळत असते. यामुळे कोविड काळात अनेक पालकांनी नोकऱ्या गमावल्या असताना, किंवा आर्थिक परिस्थितीमुळे शालेय फी भरू न शकणाऱ्या विध्यार्थ्यांच्या मदतीला धावत येत त्यांनी १ करोड रुपयांचा फंड उभा करून या मुलांना शिक्षणापासून वंचित होण्यापासून वाचवले होते. त्यांच्या या कार्याने केवळ पवईच नव्हे तर देशभरातील शाळांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

मुख्याध्यापक ते प्राचार्या अशी बढती मिळाल्यानंतर देखील त्या आता शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे काम करत आहेत.

उदयकुमार यांना मिळालेल्या गुणवंत शिक्षक सन्मानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!