आयआयटीकराच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला

आयआयटी पवई भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या खात्यातील पैसे चोरट्याने ऑनलाईन लांबवल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या तरुणाला ही बाब लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पवई येथील आयआयटी परिसरात राहणारे अविनाश आगळे, आयआयटी मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन ओव्हर्सीस बँकेच्या पवई प्लाझा येथील शाखेत त्यांचे बचत खाते आहे. याच खात्यात त्यांचे मासिक वेतन जमा होत होते.

त्यांना पाठीमागील वर्षी एप्रिल महिन्यात मिळालेली भिशीची रक्कम सुद्धा त्यांनी याच खात्यात जमा केली होती.

मला पैशांची गरज भासल्याने मी आयआयटी येथील बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढायला गेलो होतो. ९००० रुपयांची रक्कम काढण्याची मागणी केली असता पुरेशी रक्कम नसल्याच्या संदेश मला दिसला म्हणून मी ५००० रुपये काढले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात अविनाश यांनी म्हटले आहे.

अविनाश यांनी आपल्या शाखेत जाऊन याबाबत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये शिल्लक असून, त्यांच्या खात्यातून ४१ हजार रुपये विविध मार्गाने ऑनलाईन वापरल्याचे बँक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

एटीएम कार्ड स्वतःजवळ असून, खात्याची कोणतीही माहिती कोणासही दिली नसताना खात्यातून रक्कम निघाली होती. याबाबत त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes