५० वर्षीय लॅपटॉप चोराला अटक

हिरानंदानी भागातून लॅपटॉप चोरी करून पसार झालेल्या ५० वर्षीय चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उमेश रतिलाल परमार असे अटक आरोपींचे नाव असून, तो कार चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा लॅपटॉप हस्तगत केला आहे.

भारतीय शसस्त्र सेनेत कॅप्टन म्हणून कार्यरत असणारे फिर्यादी अमित राय हे आपल्या एका मित्रासोबत हिरानंदानी येथील पवई सोशलमध्ये जेवणासाठी आले होते. हॉटेलजवळ आल्यावर त्यांनी आपल्या जवळील मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप कारच्या पाठीमागील सिटवर ठेवून कार पार्किंगसाठी दिली होती.

फिर्यादी हे जेवण करून परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्यांचा कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेला लॅपटॉप तिथे नसून, कोणीतरी चोरी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पवई पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

“आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक वयस्क व्यक्ती त्या कारमधून लॅपटॉप घेवून जाताना आम्हाला आढळून आला,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.

प्राप्त माहितीच्या आधारावर सपोनि पाटील यांच्या नेतृत्वात पो.ह. टिळेकर, पो.ना. येडगे, पो.ना. झेंडे, पो.ना. राठोड, पो.ना. जाधव, पो.शि. परब आणि पो.शि. पुरी यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.

“परिसरातील विविध सीसीटीव्ही तपासले असता सदर व्यक्ती कारने एका महिलेला घेवून तिथे आला असल्याचे आढळून आले. महिलेला तिथे सोडल्यावर आपली गाडी पार्क करून रस्त्यावरून फिरत असताना त्याची नजर फिर्यादी यांच्या कारच्या पाठीमागील सीटवर असलेल्या लॅपटॉपवर पडली होती. थोडा वेळ आसपासच्या परिसरात चकरा मारल्यावर अंधार पडताच त्याने लॅपटॉप असणाऱ्या कारच्या उघड्या खिडकीतून कारचा दरवाजा उघडून कारमधून लॅपटॉप काढून आपल्या कारमध्ये जावून बसला.” असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “मिळालेल्या कार नंबरवरून आम्ही त्या कार मालकाच्या घरी पोहचल्यावर त्याने आपल्या कार चालकाचा पत्ता आम्हाला दिला. तिथे जावून परमार याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या राहत्या घरातून आम्ही चोरी केलेला लॅपटॉप सुद्धा हस्तगत केला आहे.”

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!