पोलीस शिपायाला कर्तव्यावर मारहाण; दोघांना अटक मुख्य आरोपी फरार

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरानंदानी गार्डन येथे अपघातानंतर महिलेशी वाद घालणाऱ्या तरुणांना रिक्षाने पोलीस ठाण्यात घेवून येणाऱ्या एका पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. नितीन खैरमोडे असे जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन तरुणांना ताब्यात घेतले असून ते दोघेही अल्पवयीन आहेत. मुख्य आरोपी दिपू तिवारी फरार आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी येथे ज्येष्ठ महिलेच्या कारला तरुणांनी मोटारसायकलवरून येवून धडक दिली. नियमांचं उल्लंघन करत हे तरुण ट्रिपल सीट प्रवास करत होते. काही तरुण गॅलरिया मॉलजवळ महिलेसोबत रस्त्यावर वाद घालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस शिपाई तिथे पोहचले. “तरुणांना रिक्षातून पोलीस ठाण्यात घेवून येत असताना त्यांनी मला शिवीगाळ करत, हातातील कड्याने तोंडावर मारहाण करून जखमी केले,” असे जखमी पोलीस शिपाई नितीन खैरमोडे यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“आम्ही सरकारी कामात अडथला आणणे आणि कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला (पोलीस) मारहाण करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या ३ आरोपींपैकी दोघाना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी दिपू तिवारी फरार असून, त्याचा शोध सुरु आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“तिघेही आरोपी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणानंतर राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते पवई पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. एका आमदाराचा सुद्धा माणुसकीच्या नात्याने या आरोपींना समजून घेण्याची मागणी करणारा फोन आला होता.” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

पोलिसांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडतायत, लॉकडाऊन आणि कर्फ्यू काळात सुद्धा पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांचे हे सत्र अजूनही सुरूच आहे.

One Response to पोलीस शिपायाला कर्तव्यावर मारहाण; दोघांना अटक मुख्य आरोपी फरार

  1. Name January 11, 2021 at 3:35 pm #

    Very nice

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!