दुरुस्तीस आलेल्या मोबाईलवरून सव्वादोन लाख रुपये चोरणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी केली अटक

दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाईलमधील बँकिंग एप्सचा उपयोग करून सुमारे सव्वा दोन लाख रुपये हस्तांतरीत करून मोबाईल मालकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा कसून तपास करत तीन महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

साकीनाका परिसरात राहणारे पंकज कदम यांनी त्यांच्या मोबाईलचा स्पीकर खराब झाल्यामुळे ७ ऑक्टोबरला मोबाईल दुरुस्तीसाठी साकीनाका येथील एका दुकानात दिला होता. यावेळी तेथील कर्मचाऱ्याने त्यांचे सिमकार्ड मोबाईलमध्येच ठेवण्यास सांगितले. “यावेळी दुकानात असणाऱ्या सौरभने दुसर्‍या दिवशी येऊन मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले. कदम हे दुसर्‍या दिवशी दुकानात गेले असता तेथे उपस्थित असणाऱ्या शुभम याने सौरभ बाहेर गेला आहे, दोन दिवसांनी मोबाईल मिळेल असे त्यांना सांगितले, असे पोलीस म्हणाले.

दोन दिवसांनी कदम पुन्हा दुकानात गेल्यानंतर मोबाईल देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यांना काहीतरी गडबड असल्याची शंका वाटल्याने त्यांनी आपल्या मित्राच्या मोबाईलवरून आपले बँकिंग खाते उघडून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खात्यातील एफ.डी. मोडून २.२ लाख रुपये हस्तांतरित करून दुसऱ्या खात्यात टाकण्यात आले होते.

यासंदर्भात साकिनाका पोलिसांनी कदम यांच्या तक्रारीनंतर फसवणूकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता.

कसून तपास करत अखेर तीन महिन्यांनंतर साकीनाका पोलिसांनी सौरभला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. यासाठी त्याला शुभम पवारने मदत केल्याचे देखील सांगितले. शनिवारी रात्री या दोघांनाही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक करून, न्यायालयात हजर केले असता पुढील तपासकामी दोघांना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!