हिरानंदानीतील हेरिटेज इमारतीत घरकाम करणाऱ्या श्रद्धा गायकवाड (बदलेले नाव) या १९ वर्षीय मुलीने आजाराला कंटाळून तेराव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची घटना पवईमध्ये काल सकाळी घडली. पवई पोलिसांना ती काम करत असलेल्या घरात तिने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून, तिने निराशेतून आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीतून समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आत्महत्येमुळे मात्र परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांच्या चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरानंदानीच्या हेरिटेज इमारतीत राहणाऱ्या जेष्ठ नागरिक अश्विनी किणी (७२) या आपल्या पतीच्या मृत्यू पाश्चात एकटयाच राहतात. त्यांना जास्त हालचाल करता येत नसल्यामुळे देखभालीसाठी श्रद्धाच्या बहिणीची कायमस्वरूपी सेविका म्हणून नियुक्ती केली गेली होती. अनेक वर्ष ती त्यांची देखभाल करत होती. १५ दिवसांपूर्वी तिचे लग्न झाल्यामुळे दुसरी सेविका मिळेपर्यंत श्रद्धाला देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती.
अश्विनी किणी यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार “श्रद्धा कामाला आल्यापासून खुशच होती. ती किणी यांच्या सेवेव्यतिरिक्त आपल्या अभ्यासावर सुद्धा ध्यान देत होती. दररोज संध्याकाळी ३.४५ ते ५.३० ती कॉम्पुटर क्लासला जात असे. घरात असलेल्या कॉम्पुटरवर ती सतत विविध गोष्टींबद्दल जाणून घेत बसलेली असे. सोमवारी सकाळी तिच्या आई सोबत फोनवर बोलल्यानंतर अचानक तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे.”
या संदर्भात बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षका वसावे यांनी ‘आवर्तन पवईला’ सांगितले “माहिती मिळताच आम्ही जखमी अवस्थेत असणाऱ्या श्रद्धाला तातडीने राजावाडी रुग्णालयात घेवून गेलो; परंतु त्या पूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. ती काम करत असलेल्या ठिकाणी आम्हाला तिने लिहून ठेवलेली चिट्ठी भेटली आहे. त्यात तिने आपल्या आईला ‘मी इथून पुढे तुला कुठलाच त्रास देणार नाही. तू माझी वाट पाहू नको’ असे लिहून ठेवले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या कि, तिच्या आईने दिलेल्या जवाबानुसार तिला टीबी झाला होता आणि त्यावर उपचार सुद्धा चालू होता. तिच्या या आजारामुळे तिला आपण सतत घरच्यांसाठी ओझे झालो आहोत असे वाटत होते आणि तिने तसे बोलून ही दाखवले होते असे सांगितले. सकाळी झालेल्या चर्चेत सुद्धा तिने याचा उल्लेख केला असल्याचे तिच्या आईने सांगितले.
या आत्महत्येच्या घटनेनंतर परिसरात पसरलेल्या बातमीने मात्र घरकाम करणाऱ्या महिलांच्यामध्ये चांगल्या आणि वाईट अशा बऱ्याच चर्चेला रंग आला होता आणि या आत्महत्येमागे असलेल्या अनेक कारणांचा कयास या महिला मंडळांकडून लावला जात होता.
पवई पोलिसांनी या संदर्भात आत्महत्येची नोंद केली असून आत्महत्ये मागे अजून ही कोणते कारण आहे का याची अधिक माहिती घेत आहेत.
No comments yet.