पाकिस्तानने कथित ‘रॉ’चे एजंट म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव हे एक व्यावसायिक असून, भारताला खबर न देता नागरिकाला अटक करणे, त्याला फाशीची शिक्षा देणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. जाधव यांच्याकडून जबरदस्ती आरोप कबुली केली असल्याचा आरोप करत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला दमदार पक्ष ठेवत पाकिस्तानचे सगळे पितळ उघडे पाडले आहे.
गेल्या महिन्यात मिलिटरी कोर्टाचा निर्णय होताच १८ लोकांना फाशी देण्यात आली होती. जाधव यांच्यासोबत सुद्धा पाकिस्तान असे करण्याची शक्यता असल्याची भिती व्यक्त करत त्यांची फाशीची शिक्षा त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा सुनावणीच्या वेळी करण्यात आली.
पवईकर कुलभूषण जाधव यांना ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. याच्या विरोधात भारताने ८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली. ज्याबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीत जाधव यांच्या ज्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होते, तो व्हिडिओ आंतरराष्ट्रीय कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारण्यात आली. भारताच्यावतीने जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी भक्कमपणे कोर्टासमोर भारताची बाजू मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे असा दावा यावेळी त्यांनी कोर्टासमोर करत पाकिस्तानचा बुरखा फाडला. कोर्टाने यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
मूळचे सांगलीचे व पवईकर असणारे कुलभूषण जाधव हे काही काळ भारतीय नौदलात कार्यरत होते. ज्यानंतर जाधव यांनी नौदलातून सेवानिवृत्ती घेत स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप ठेवत बलुचिस्तानमधून त्यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी अटक केली होती.
परराष्ट्र मंत्रालयाकडून कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न चालू होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती कुलभूषण जाधव यांच्या आईला दिली असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान अशी दोन्ही पक्षाची दोन वेगवेगळ्या सत्रात बाजू मांडून झाली असून, लवकरच आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्यावर निर्णय देणार असल्याचे कोर्टाने सांगितले.
No comments yet.