“परिसरातील पाण्याच्या समस्येचा पाठपुरावा मी शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने गेली अनेक महिने करत आहे. या संपूर्ण मंजुऱ्या या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचेच आहे. याचे श्रेय लाटू इच्छिणाऱ्यांनी पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत” – निलेश साळुंखे – शाखाप्रमुख ११५.
“शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात, पण हे श्रेय सर्वस्वी आमचेच आहे.” – नगरसेवक प्रतिनिधी
आयआयटी, तिरंदाज व्हिलेज येथे नुकत्याच मंजूर झालेल्या ६ व ९ इंचाच्या जलवाहिनीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा व शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांच्यात या मंजुरीचा श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. नगरसेवकांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी मंजुरीचे डिजिटल पत्रक काढताच, शाखाप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनीही मंजुरी शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झाल्याची पत्र टाकून दावा केल्याने दोन्ही पक्षांमध्ये श्रेयाचा सामना चांगलाच रंगला आहे.
पवई भागात पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जुन्या जर्जर झाल्याने अनेक ठिकाणी व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होत नाही आहे. काही भागात जलवाहिन्या मध्येच फुटल्याने पाणीपुरवठा खंडित होत आहे. याबाबत स्थानिक प्रतिनिधींनी पाठपुरावे सुरु केले होते. यापैकी काही भागात नगरसेवक यांच्या प्रयत्नातून व पालिका फंडातून कामे करण्यात आली आहेत, तर काही भागात शाखाप्रमुख यांच्या प्रयत्नाने आमदार फंडातून कामे केली गेली आहेत. तिरंदाज येथील जलवाहिनी बदलण्याचे काम हे मोठे आहे. याचेचे श्रेय हे आपणास मिळाल्यास २०१७ पालिका निवडणुकीच्या काळात याचा फायदा होऊ शकतो हे पाहता दोन्ही पक्षाच्या लोकांची हे श्रेय मिळवण्यासाठीची रस्सीखेच चालू आहे.
याबाबत बोलताना नगरसेवकांच्या प्रतिनिधींनी सांगितले, “आम्ही २०१३ पासून विविध भागातील पाणी समस्येबाबत पालिकेत पाठपुरावा करत आहोत. या सर्व मंजुऱ्या नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न आणि पत्रव्यवहारामुळेच झालेल्या आहेत. शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात, पण हे श्रेय सर्वस्वी आमचेच आहे.”
“स्थानिक गेली अनेक वर्ष पाण्याच्या समस्येशी लढत आहेत. कोणताच प्रतिनिधी त्यांची समस्या सोडवू शकत नाही आहे हे पाहता, स्थानिकांनी माजी महापौर दत्ता दळवी आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांची भेट घेऊन शिवसेनेकडे ही समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार करत आणि पालिकेचे सहआयुक्त आणि जल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन यातील अनेक प्रकल्प मंजूर करून घेत अनेक भागात सध्या मुबलक पाणीपुरवठा होत आहे. तिरंदाज येथील समस्या सुद्धा तेव्हाच मांडली गेली होती; परंतु मोठा प्रकल्प असल्याने मंजुरीस वेळ लागेल असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली असून हे श्रेय फक्त आणि फक्त शिवसेनेचेच आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “नगरसेवक हे त्या विभागाचे पालिकेत प्रतिनिधित्व करत असतात. पालिकेत त्यांच्या विभागातील कोणतीही मंजुरी होताच प्रथम नगरसेवकाला कळवले जाते. याचाच फायदा घेऊन मंजुरीचे पत्र मिळताच, त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत नगरसेवकांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाल्याची घोषणा करून ते मोकळे झाले आहेत. मात्र सत्य जनता चांगलेच जाणून आहे.
जलवाहिनीमुळे तिरंदाज येथील जनतेचा एक मोठा प्रश्न मिटला असला तरी या वादांमुळे जनता संभ्रमात पडली असून आता कामाचा नारळ कोणाच्या हस्ते फुटणार व २०१७ पालिका निवडणुकीत जनता कोणाला पसंती देते यावरूनच श्रेय कोणाचे हे स्पष्ट होईल.
No comments yet.