प्रकाशन सोहळा : शनिवार २० जानेवारी,सायंकाळी ४.३० वाजता दादर क्लब, स्वामी नारायण मंदिरजवळ, दादर (पूर्व)
लेखक, व्यावसायिक आणि शिक्षक प्रमोद सावंत लिखित, स्वच्छंद प्रकाशनचे ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज, २० जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता दादर क्लब येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक किशोर खरात, व्यवस्थापन तज्ज्ञ – लेखक – वक्ता गिरीश जाखोटीया आणि माध्यम तज्ज्ञ संजय रानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेली ५ वर्ष आपल्या लेखणीच्या सहाय्याने वेगवेगळ्या उद्योजकांचा प्रवास माध्यमांद्वारे मांडून वाचकांच्या मनावर ठसा उमटवणारे युवा लेखक प्रमोद सावंत यांनी दलित उद्योजकांचा रोमांचक वाटणारा खडतर प्रवास आपल्या ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केला आहे.
जाती आणि धर्माच्या पलीकडे जावून प्रस्थापित व्यवस्थेकडून नाकारल्याने आर्थिक आणि मूलभूत गरजेपासून वंचित असलेली कोणतीही व्यक्ती म्हणजे दलित अशी प्रमोद दलित यांची व्याख्या करतात. व्यवस्थेकडून नाकारलेल्या अशा ११ लोकांची संघर्ष गाथा त्यांनी आपल्या या पुस्तकामधून मांडली आहे.
मुळात आजची तरुण पिढी ही वाचत नाही अशी सर्वांची तक्रार असते. तरुणांचा पुस्तके वाचण्यात रस तर आहे, मात्र भली मोठी आणि चिक्कारे पाने असणाऱ्या पुस्तकांपासून ही पिढी नेहमीच दूर पळते. अशा तरुणांना सुद्धा एक किंवा दोन बैठकीत संपवता यावे अशा प्रकारे या पुस्तकाची मांडणी, रचना केली असल्याचे त्यांनी पुस्तकाबाबत बोलताना सांगितले.
No comments yet.