मंडळाने ‘नाम‘ फाउंडेशनला मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन धनादेश केला सुपूर्द
दुष्काळग्रस्त व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी झटणारे सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला मदत म्हणून, पवईच्या जय अंबे मित्र-मंडळाच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मकरंद अनासपुरे यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरूण बालन, महेश घुगे, दत्ता साळुंखे, मनोज दुबे, राजेश चव्हाण, संतोष कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंडळातर्फे सांगण्यात आले, “काही दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे, ज्याच्यासाठी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून देणगी जमा केली जात आहे. महाराष्ट्र दुष्काळात असताना आम्ही धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याऐवजी संस्कृती जपत साध्या पद्दतीने उत्सव साजरा करण्याचे आणि या संस्थेला मदत करण्याचे ठरवले होते. आज आम्ही आमच्या जमा रक्कमेतील पंचवीस हजाराचा धनादेश मकरंद सरांना सुपूर्द केला आहे, ज्यामुळे आम्हाला एक आत्मिक समाधान मिळत आहे.”
दुष्काळग्रस्त व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात देणाऱ्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला आता व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यांनी शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी लोकचळवळ उभी रहावी म्हणून पुढाकार घेतला आहे. जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी त्यांनी ‘नाम’ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. ज्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून कानाकोपऱ्यातून लोक मदतीचा हात देत आहेत.
तुम्हीही करू शकता मदत
या लोकचळवळीत तुम्हीही सहभागी होऊ शकता. इच्छुकांनी संस्थेच्या नावाने धनादेश किंवा संस्थेच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करावयाची आहे. देणगी स्वरुपात केलेली मदत कुणापर्यंत पोहोचली याची माहितीही तुम्हाला संस्थेकडून दिली जाणार आहे.
या खात्यात जमा करा पैसे
एसबीआय करंट अकाऊण्ट नंबर – ३५२२६१२७१४८
IFC Code No. – SBIN 0006319
Swift Code No. – SBININBB238
No comments yet.