आपल्या गरीब कुटूंबाला मदतीचा हात देण्यासाठी नोकरीच्या शोधात असणाऱ्या नालासोपारा येथील १९ वर्षीय मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून, रविवारी साकिनाका येथे बंदिस्त खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर मुलीने फोन करून मदतीची साद घालताच साकिनाका पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम राबवून मुलीची सुटका केली. मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अपहरण करणाऱ्या दुकलीतील एकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. साकिनाका विभागात मुलीला डांबून ठेवण्यास मदत करणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
नोकरीसाठी धडपडत असणारी १९ वर्षीय सुमेधा (बदललेले नाव), तिला नोकरी मिळवून देणाऱ्या चंद्रकांत महिडा (३१) यांस भायंदर येथील जैसल पार्क येथे रविवारी भेटावयास गेली होती. तेव्हा महिडा याने सुमेधाला साकिनाका येथे असणाऱ्या अजून एका व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितले. त्या व्यक्तीस फोन करून सुमेधा त्यास भेटण्यास साकिनाका येथे आली. एकटी आलेल्या सुमेधाचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने तिला एका अनोळखी ठिकाणी घेऊन जावून खोलीत डांबून तो तेथून निघून गेला. जाताना मात्र मुलीचा फोन काढून घेण्यास विसरल्याने त्याचा फायदा घेऊन सुमेधाने मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला.
माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी सर्च मोहीम राबवून मुलीची सुटका केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारावर भायंदर पोलिसांना माहिती देवून महिडा याला भायंदरमधील नवघर येथून अटक केली गेली. साकिनाका येथे मुलीला डांबून ठेवलेल्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “नोकरीची गरज असल्याने सुमेधा ही महिडाच्या संपर्कात आली होती, ज्याचा फायदा घेऊन त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने काहीतरी वेगळाच बेत आखलेला होता. आमचा तपास चालू असून, महिडा आणि त्याचा साथीदार हे गरीब गरजू मुलींना नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांना देह व्यवसायात ढकलत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दिशेने सुद्धा आमचा तपास चालू आहे.”
No comments yet.