महानगरपालिका निवडणूक आता काही महिन्यांवर असतानाच, पक्ष व्यवस्थेला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि कणा मानले जाणारे सुरेश पंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, विभाग प्रमुख दत्ता दळवी, शाखाप्रमुख निलेश साळुंखेसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे एकीकडे शिवसेनेची ताकत पवईत वाढत असतानाच रिपाईला मात्र हे मोठे खिंडार मानले जात आहे.
रविवारी शिवसेना शाखा ११५ च्या आयआयटी येथील कार्यालयात अधिकारिक स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला.
सुरेश पंडागळे हे रिपाईच्या सुरवातीच्या काळापासून पवईतील पक्ष उभारणीच्या कामात पहिल्या फळीत असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली परिवारातील आणि स्थानिक भागातील लोकांनी पक्षात विविध पदे ग्रहण केली आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळेच पक्ष श्रेष्ठींपासून सर्वांनी त्यांना रिपाईचा कणा अशी उपमाही दिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यात पक्षात असणाऱ्या अंतर्गत वादासह पक्षात मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून त्यांनी अखेर रविवारी अधिकारीक स्वरूपात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
याबाबत आवर्तन पवईशी बोलताना शिवसेनेचे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले, “पंडागळे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या भूमिका आणि निर्णयामुळे तेथील स्थानिक जनतेचा त्यांच्यावर खास विश्वास आहे. असा तळागाळातील आणि मुरलेला कार्यकर्ता मिळणे हे आमच्या आणि शिवसेनेच्या हिताचेच आहे. पंडागळे यांच्या प्रवेशाने आमची ताकद अजून वाढली आहे.”
पक्ष प्रवेशात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक अमोल चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंडागळे यांना इतर पक्षाकडून येत असलेल्या दबावातही त्यांच्या सोबत राहून चव्हाण यांनी शिवसेनेत हा प्रवेश घडवून आणलेला आहे.
“पूर्वीच्या पक्षाची स्थानिक पातळीवरील कार्यपद्दती आणि पक्षातील वागणूकीला कंटाळून ते त्या पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांना जनतेसाठी काम करायचे आहे. पवईत सध्या शिवसेना या एकमेव पक्षाचे नेतृत्व चांगले आहे आणि यांच्यातर्फे जनतेची कामे सुद्धा केली जात आहेत. म्हणूनच त्यांनी या पक्षात सामिल होण्याचे ठरवले” असे आवर्तन पवईशी बोलताना त्यांच्या सोबत सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.