@अविनाश हजारे, रविराज शिंदे
नवनिर्वाचित कॉग्रेसच्या नगरसेविका (प्रभाग क्रमांक ११६) प्रमिलाताई पाटील यांचे पार्थिवावर आज (बुधवारी) सोनापूर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. अंतयात्रा दिनाबामा पाटील इस्टेट येथून निघून एलबीएस मार्गाने सोनापूर स्मशान भूमी येथे नेण्यात आली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय अंतयात्रेला सहभागी झाला होता.
भांडूपच्या दिना बामा पाटील इस्टेट येथे प्रमिला पाटील यांचे पार्थिव अंतदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. भांडूप विभागातील तमाम नागरिकांनी प्रमिला पाटील यांना साश्रू नयनांनी अलोट जनसागर व शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.
मुंबईचे महापौर श्रीकांत महाडेश्वर, कॉग्रेसचे कृपाशंकर सिंह, आमदार अशोक पाटील आदी दिग्गजांनी प्रमिला पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले.
अत्यंत मनमिळावू, सहृदयी, कामाप्रती अत्यंत प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या पाटील यांच्या अकाली निधनाने भांडुपमध्ये शोककळा पसरली आहे.
माजी खासदार संजय पाटील यांच्या थोरल्या वाहिनी व दिवंगत कामगार नेते दीना बामा पाटील यांच्या सून आहेत. त्यांच्या पश्चात मुलं, मुली, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कुठलेही पद नसताना समाजकार्य करून लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवले होते. त्याचीच पोचपावती म्हणून नुकत्याच पार पाडलेल्या पालिका निवडणुकीत त्यांना लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते.
निवडून आल्यानंतर अगदी कमी वेळेत त्यांनी कामांचा झंझावात दाखवत अनेक लोकोपयोगी कामांची सुरुवात केली. नुकतीच मुंबई महानगरपालिकेची जकात चोरी करून मुंबईच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या आठ ट्रक पकडून दक्षता पथकाच्या हवाली केल्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले होते.
लोकसेवेत स्वतःला अर्पण करून घेतलेल्या प्रमिलाताईना मंगळवारी सायंकाळी घरी असतांना अस्वस्थ वाटू लागले होते. फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यांच्या अचानक जाण्याने एक तडफदार नेतृत्व हरवल्याची हळहळ तमाम जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
No comments yet.