पोलिसांच्या वेशात दोन इसम चांदिवली येथील नहार अमृत शक्ती कॉम्प्लेक्स भागात पैसे मागत असल्याची धक्कादायक चर्चा आहे. जवळपास आठवडाभर या दोघांनी अनेक लोकांकडे विशेषतः महिलांकडे पैशांची (देणगी) मागणी केल्यानंतर परिसरात सोशल माध्यमातून हा चर्चेचा विषय बनला आहे.
यासंदर्भात पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्यांच्या वेशात दोन पुरुष चांदिवली येथील नहार अमृत शक्ती भागात पाठीमागील ८ ते १० दिवसांपासून फिरत होते. या परिसरात पार्क केलेल्या गाड्यात असणाऱ्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला पाठिंबा देण्याच्या नावाखाली निधी मागताना आढळून येत होते.
“दोन्ही इसम हे पोलिसांच्या वेशात असल्याने पोलीस तपासणी करत असावेत असे नागरिकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी समोर किंवा जवळ येताच अनेक वाहनचालक थांबत असे. त्यांच्या हातात कसलेतरी कागद असे, त्यांच्या गणवेशावर असणारे लोगो देखील पोलिसांचे असावेत असेच होते, त्यामुळे त्यांचे कार्य अधिकृत असल्याचे भासत होते,” असे नागरिकांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.
मुंबई पोलीस सतत ७-८ दिवस परिसरात रस्त्यांवर फिरून देणगी कशी मागू शकतात ? याबाबत संशय आल्याने जागरूक नागरिकांनी त्यांच्या जवळ जावून विचारणा करत याचे चित्रीकरण केले. दोघेही याबाबत समधानकारक उत्तर देवू शकले नाहीत.
ते कोणी पोलीस नसून, पोलिसांच्या वेशात ते लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळत असल्याबाबत चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने ‘एक्स’च्या माध्यमातून तक्रार करत याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले.
तपासात ते दोन्ही इसम बहुरूपी असल्याचे समोर आले असून, पोलिसांचा पेहराव करून लोकांकडून देणगी घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
यातील एका व्यक्तीच्या गणवेशावर ए बी चव्हाण असा त्याच्या नावाचा बिल्ला असून, तो नागरिकांना दाखवत असलेल्या प्रमाणपत्रावर ‘राजश्री छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृह’ असा उल्लेख आहे. या प्रमाणपत्रावर व्यक्तीच्या नावाचा श्री अजय भीमराव चव्हाण असा देखील उल्लेख आहे.
कोण आहेत बहुरूपी ?
बहुरूपी महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक आहेत. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार (पोलीस), हनुमान, शंकर (देव-देवता), विदुषक, यम, राक्षस यांचे वेश धारण करून गावभर फिरत. गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत. शिवाजी महाराजंच्या काळात हे लोक वेशांतर करून गुप्त माहिती जमा करत असत. मात्र आता या लोकांची संख्या कमी होताना दिसत असून, नवीन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने बहुतेकवेळी शहरामधे आपली कला दाखवताना पाहिले जाते, मुख्यत्वे करून हे पोलिसाच्या वेशात फिरतात ज्यामुळे यामुळे यांना भामटे फसवणूक करणारे समजून लोकांच्या रोशाला समोरे जावे लागते.
डहाणू, पालघर तालुक्यातील काही खेड्यापाड्यात आजही या लोकांच्या वस्त्या आहेत. जे मुंबईच्या विविध भागात जावून ‘चला चला साहेब लोक आलेत बिन पगारी आणि फुल अधिकारी’ असे म्हणत हे लोक मनोरंजन करून आपले पोट भारतात. मात्र बहुरूपीच्या नावाखाली काही भामटे, चोर देखील याचा फायदा घेत असल्याची प्रकरणे घडली आहेत.
No comments yet.