पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला आहे असे सांगत भांडूप पोलिसांचा गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ
बसमधून प्रवास करताना अठरा वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताला त्या रणरागिनीने चांगलाच इंगा दाखवला आहे. सहप्रवाशांची साथ मिळत नसतानाही तिने धाडस करून त्याला धरून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी आरोपी अशोक नलवे (४३) यास भादवी कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली आहे.
गोरेगाव येथील एका नामांकित कंपनीत प्रशिक्षण घेत असलेली व मुलुंड येथे राहणारी अठरा वर्षीय कॉलेज तरुणी बुधवारी रात्री ९.४५ वाजता आपल्या घरी बसने (४६०) परतत होती. बसमध्ये महिलांसाठी राखीव असणाऱ्या सिटवर ती बसली असताना, पवई तलावाजवळ बस आल्यावर तिला तिच्या पाठीमागील सिटवर बसलेला एक इसम सिटमध्ये असलेल्या फटीतून हात घालून तिच्याशी अश्लील चाळे करत असल्याचे जाणवले. याबाबत तिने लगेच आवाज उठवताच ‘चुकून झाले’ असे त्या इसमाने काहीच घडले नाही अशा स्वरात सांगून तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
तरुणीने लगेच कंडक्टरला बोलावून सगळी हकीकत कथन केल्यानंतर त्यास उतरवू का असा प्रश्न कंडक्टरने पिडीत तरुणीला केला, मात्र तिने नकार देवून “मला त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे आहे, रस्त्यात लागणाऱ्या पोलीस ठाण्याजवळ तुम्ही गाडी थांबवा” अशी कंडक्टरला विनंती केली.
काही वेळातच एक गृहस्थ उठून येऊन ‘क्या रे तेरे घर मे मा बहन नही है क्या?’ असा त्याला दम देवून तरुणीला त्याच्या कानशिलात भडकवण्यास सांगितले, मात्र तिने तसे करण्यास नकार दिला. त्याच्या वागण्यातून तो अशा प्रकारचे कृत्ये करण्यात सराईत असल्याचे तिला जाणवत असल्याने त्याला पोलिसांच्या हवाली करूनच शिक्षा घडवायची तिची इच्छा होती. याकाळात वडिलांना या संदर्भात कळवून तिने भांडूप पोलीस ठाण्यात येणास सांगितले.”
याबाबत फेसबुकच्या माध्यमातून राग व्यक्त करताना ती म्हणते, “भांडूप पोलिसांनी हकीकत ऐकून घेतल्यावर हे पवईच्या हद्दीत घडले आहे तुम्ही तिथे जावून तक्रार नोंद करा असे आम्हास सांगितले. शेवटी पवई पोलीस ठाण्यात माझी तक्रार नोंद करून घेण्यात आली.”
“हे सगळे करण्यापाठी माझा उद्देश हा मुलींनी धाडस करून पुढे येणे आहे. आम्हा मुलींसोबत शाळेपासून, कॉलेज, बाजार, बसस्थानके अशा अनेक ठिकाणी छेडछाड, अश्लील चाळे, सतावण्याचे प्रकार घडत असतात. अशा वेळी समोरच्याला एक थोबाडीत मारून सोडून देणे पुरेसे नाही. असे कृत्य करणारा पहिल्यांदाच करत असेल हे नक्की नाही, मुली याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशी कृत्ये करणाऱ्याचे मनोबल वाढत जाते आणि तो भेटेल त्या स्त्रीशी असे चाळे करत राहतो. अशा लोकांना पोलिसांच्या हवाली करणे हा एकमेव पर्याय आहे आणि महिलांनी यासाठी पुढे येणे आवश्यक आहे” असे याबाबत बोलताना तरुणीने सांगितले.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी याबाबत बोलताना सांगितले, “तरुणी पोलीस ठाण्याला आल्यावर आमच्या अधिकाऱ्याने लगेच भादवी कलम ३५४ नुसार तक्रार नोंद करून घेत आरोपीस अटक केली आहे.”
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे म्हणतात, “पवई पोलीस ठाणे हे केवळ काहीच अंतरावर असल्याने आम्ही तिथे जावून तक्रार नोंद करण्याची विनंती तरुणीला केली होती. सोबत आम्ही आमचा एक शिपाई सुद्धा पाठवला होता. आरोपी आणि तरुणी दोघांनाही वेगवेगळ्या गाडीतून नेण्याची सोय केली होती”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.