पवई, आयआयटी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार मलबा टाकून परिसरात घाण पसरवत आहेत. या कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे मुश्कील झाले असून, परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून केले जात आहेत. शेवटी या समस्येला वाचा फोडण्यासाठी स्थानिकांनी सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करून आपली ही समस्या प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
उंच उंच इमारती आणि सर्व सुखसोईयुक्त ठिकाण म्हणून ज्या पवईला आज ओळखले जाते, त्याची अजून एक बाजू आहे. ओल्ड पवई म्हणून ओळखले जाणाऱ्या आयआयटी परिसरात अजूनही हजारो कुटुंबे झोपडपट्टीत राहत असून, त्यांची छोट्या छोट्या सुविधांसाठी आजही लढाई चालूच आहे. केवळ मते मागण्यासाठी दिसणारे निवडलेले प्रतिनिधी, परत पुढच्या ५ वर्षानंतर मते मागायला येतात. तो पर्यंत ‘स्थानिक जगले कि मेले’ याच्याशी त्यांचा तिळमात्र संबंध नसतो. असे आरोप आता येथील स्थानिक नागरिकांकडून केले जात आहेत.
आयआयटीच्या रमाबाई आंबेडकर नगर भाग २ मध्ये गेली अनेक दिवस कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यात भर म्हणून बांधकाम करणारे व्यावसाईक आणि कामगार, निघालेला टाकाऊ मलबा सुद्धा इथेच आणून टाकत आहेत. या मलब्याचे आता डोंगर तयार झाले असून, याबाबत स्थानिकांनी महानगरपालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक, आमदार यांना वारंवार तक्रारी दिल्या आहेत; परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नाहीत. हे पाहता आता काही स्थानिक तरुणांनी मिळून, सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या माध्यमातून आता संबंधित समस्या स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत पोहचवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या माध्यमातून बोलताना स्थानिक नागरिक संतोष साळवे म्हणाले “महानगर पालिकेच्या ‘एस’ विभागअंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर, या आमच्या परिसरात गेल्या १ महिन्यापासून टाकावू कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. याबाबत आमच्याकडून शेकडो तक्रारी महानगरपालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांना देण्यात आलेल्या आहेत; परंतु कोणीही आमची ही समस्या येऊन पाहण्याचे धाडस केलेले नाही आहे. केवळ मतदानाच्या काळात मते मागायला आल्यावरतीच यांचा चेहरा आम्हाला पाहायला मिळतो.”
ते पुढे म्हणाले “हा संपूर्ण परिसर हा दलित वस्तीचा असून स्थानिकांना या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी पैदा होणाऱ्या आजार पसरवणाऱ्या जिवांमुळे येथील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक हे ताप, जुलाब, डायरिया सारख्या आजाराने पिडीत आहेत. याबाबत प्रशासन व प्रतिनिधीना वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारीनंतर सुद्धा ते काळजी नसल्यासारखे वागत आहेत.”
याबाबत स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्यांचे प्रतिनिधी राजू भाई यांनी avartanpowai.info शी बोलताना सांगितले कि “तो संपूर्ण कचरा हा त्या भागात बांधकाम काम करणाऱ्या लोकांनी आणून टाकलेला आहे. या पूर्वीच आम्ही तिथून मलबा उचलला होता. आता परत जमा झाला असून २ दिवसापूर्वीच ‘एस’ वार्डाचे कनिष्ठ अभियंता नलावडे आणि टीम यांनी परिसरात येवून पाहणी केली आहे. येत्या २ दिवसात पंचनामा करून संपूर्ण मलबा हटवण्याचे काम केले जाणार आहे. तो संपूर्ण मलबा एक गाडीने निघणे कठीण असून किमान ३ गाडी मलबा निघेल. आज पुन्हा आम्ही जावून परिसरात पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करतो.
आम्ही त्या परिसरात कचरा उचलण्यासाठी छोटा हत्ती या गाडीची सोय केलेली आहे; परंतु त्या भागात बांधकामाचा मलबा टाकलेला असल्या कारणाने आमची गाडी परिसरात कचरा उचलायला सुद्धा जावू शकत नाही. तसेच मलबा टाकणारे नगरपालिकेची पावती फाडत नसल्याने महानगरपालिका सुद्धा कारवाईसाठी दिरंगाई करते. मी आजच ‘एस’ वार्डाचे कनिष्ठ अभियंता नलावडे यांच्याशी चर्चा करून तो मलबा त्वरित हटवायला सांगतो” असे वार्ड क्रमांक ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी याबाबत avartanpowai.info शी बोलताना सांगितले.
एस वार्ड अधिकारी नलावडे यांनी या बाबत बोलताना सांगितले “आज आमचा एक प्रतिनिधी जावून संपूर्ण परस्थितीची पाहणी करणार आहे. आम्ही पंचनामा करून कचरा टाकणाऱ्या बांधकाम ठेकेदार, कामगार यांना दंड ठोठवून येत्या २ दिवसात संपूर्ण कचरा हलवण्याची सोय करत आहोत.”
No comments yet.