पवईमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत कठोर पाऊले उचलत शाळेने संबंधित विद्यार्थ्याचे १५ दिवसांसाठी शाळेतून निलंबन केले आहे.
शाळा आणि घरातील वातावरणात मुलांवर अनेक सुसंस्कार घडत असतात, मात्र सहज उपलब्ध असणारी अनेक माध्यमे व आई-वडील दोघीही नोकरी करत असणाऱ्या परिवारात अनेकदा मुले भरकटली जातात. नजानतेपणे आकर्षणा पोटी मुले असे कृत्य करतात. जे वाईट आहे याचे भान सुद्धा त्यांना उरत नाही. असेच काहीसे पवईतील एका नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेत घडले आहे.
सुमन (बदललेले नाव) ही आपल्या शाळेत खेळत असताना, याच शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकणारा विद्यार्थी सुमित (बदललेले नाव) याने येवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे भांबावून गेलेल्या व काय करावे सुचत नसणाऱ्या सुमनने काही वेळाने मात्र धाडस करत मुख्याध्यापिकांना घडलेला प्रकार सांगितला.
बराच वेळ उलटूनही सुमितवर काहीच कारवाई होत नाही हे पाहता, सुमन सोबत घडलेल्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी व मैत्रिणी यांनी पुन्हा मुख्याध्यापिकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. ज्यानंतर सुमितला बोलावून सत्य जाणून त्यास १५ दिवसासाठी निलंबित केले आहे.
याबाबत बोलताना नाव न-जाहीर होण्याच्या अटीवर शिक्षकांनी सांगितले, “आम्ही विद्यार्थ्यावर कारवाई केली असून, मुलीलाही मानसिक आधार देत आहोत. आमच्या कोणत्याही एका चुकीच्या पावलामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे आयुष्य बिघडू शकते हे लक्षात ठेवून कारवाई करणे भाग होते. शाळेत या पूर्वी कधीही असा गैरप्रकार घडलेले नाही आहे आणि इथून पुढे घडणार नाही याची आम्ही काळजी घेवू.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, ‘सध्या मुलांना सहज सोपी साधने उपलब्ध आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक गोष्टी गैरमार्गाने समोर येत आहेत. ज्याच्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊन, केवळ आकर्षणा पोटी अनेक मुले ही वाममार्गाकडे वळत आहेत. पालक कधी मुलगा ऐकत नाही, स्वतःमध्ये रमतो, कोणत्याही गोष्टीपासून दूर पळतो, व्यसनाधीन आहे अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन आमच्याकडे नेहमी येतात. त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला हे लक्षात येते कि आई-वडील-मुलगा/मुलगी यांच्यातील सुंसंवादाची कमी, मुलांकडे होणारे दुर्लक्ष यासारख्या अनेक गोष्टींमुळे मुले त्यांना पडलेल्या प्रश्नांचा, समस्यांचा त्यांना हवा तसा अर्थ लावतात. बरेचदा ते चुकीचे निर्णय घेतल्याने गैरप्रकार करून बसतात. त्यामुळे अशा गोष्टींसाठी विदयार्थ्यांपेक्षा त्यांचे पालक आणि आसपासचे वातावरणच जास्त जबाबदार असते.
याबाबत विद्यार्थी पालक संघटनेतर्फे शाळेला विचारणा केली जात असून, अशा प्रकारची कृत्ये पुन्हा घडू नयेत आणि कडक शिक्षा होण्यासाठी शाळेने कठोर नियम बनवण्याची मागणी सुध्दा संघटनेतर्फे केली जात आहे.
No comments yet.