सुरक्षा व्यवस्थेला भेदत ऑफिसमध्ये १२ लाखाची चोरी

asdहिरानंदानी येथील डेल्फी इमारतीत घुसून एका चोरट्याने एकाच कंपनीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील ऑफिसमध्ये घुसून १० लाखाचे दागिने आणि २ लाखाची रोख रक्कम असा १२ लाखाच्या संपत्तीवर हात साफ केला आहे. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराभोवती कपडा गुंडाळून चोरी करणाऱ्या चोरट्याने या चोरीची साधी कल्पनाही सुरक्षा व्यवस्थेला लागू न देता व आपली ओळख पूर्णपणे लपवून ठेवत हे काम केले आहे. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

हिरानंदानी मधील डेल्फी इमारतीत समुद्रातून तेल काढणाऱ्या नामाकिंत कंपनीसाठी कंत्राट सांभाळणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे. गुरुवारी दिवसभराचे काम संपल्यानंतर संध्याकाळी ऑफिस बंद करून कर्मचारी निघून गेले. शुक्रवारी सकाळी जेव्हा ऑफिस उघडले गेले तेव्हा पाहतात तर काय ऑफिसमधील बरेच लॉकर्स उघडे पडले होते, अनेक लॉंकर्समध्ये ठेवलेल्या किंमती वस्तू चोरी झाल्या आहेत. याबाबत लगेचच पवई पोलिसांना कळवण्यात आले असता, त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून, सर्व सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरु केली आहे.

याबाबत बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला सीसीटीव्ही फुटेज व चौकशीतून आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर चोर हा इमारतीत शिड्यांवरून आत आला आहे असे दिसते आहे. पुढे त्याने प्रथम डक्टच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावरील ऑफिसच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. संपूर्ण शरीराभोवती कपडा गुंडाळून त्याने प्रथम संपूर्ण ऑफिसमध्ये लागलेले सर्वसीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून तिथे चोरी केली. आल्या मार्गाने परत जावून पुन्हा तिसऱ्या माळ्यावर सुद्धा त्याने डक्ट व बाथरूमच्या साहय्याने ऑफिसमध्ये प्रवेश करून हात साफ केला व या सर्वांची खबर न लागता आणि कोणत्याही प्रकारचा पुरावा पाठीमागे न सोडता तो आपले उद्देश साधण्यात यशस्वी झाला आहे.”

ते पुढे म्हणाले, “त्याच्या एवढ्या खबरदारी नंतरही आमच्या हाती काही धागेदोरे लागले असून लवकरच आम्ही या गुन्ह्याची उकल करू.”

चोरट्याने चोरी केलेले १० लाखाचे दागिने हे या कंपनीत काम करणारे आणि नुकतेच पवईमध्ये राहण्यास आलेल्या एका कामगाराचे आहेत, तर दररोजच्या खर्चासाठी लागणारी रक्कम म्हणून ठेवण्यात आलेली २ लाखाची रक्कम आहे. चोरट्याने ऑफिसमध्ये असणारे गोदरेजचे लॉकरसुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो त्यात अपयशी ठरला.

“चोर हा इथे काम करणारा असावा अथवा त्याचे या ऑफिसमध्ये नेहमीचे येणेजाणे असले पाहिजे. कारण त्याला ऑफिसमध्ये लावलेल्या सर्व सीसीटीव्ही सोबतच, कोणत्या लॉकरमध्ये किंमती सामान आणि रोख रक्कम आहे हे माहित होते, म्हणूनच त्याने तिच लॉकर्स तोडलेली आहेत” असे आवर्तन पवईशी बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.

या घटनेमुळे मात्र या इमारतीत ऑफिस असणाऱ्या लोकांनी ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने आणि वृद्ध सुरक्षारक्षकांची नियुक्ती असल्यामुळे कोणीही येऊन चोरी करून जावू शकतो. या आधीही तीन यशस्वी चोऱ्या झाल्यानंतरही याची व्यवस्था पाहणाऱ्या प्रशासनाला जाग येत नसल्याने हे असे किती दिवस चालणार? असा संतप्त सवाल आता येथील लोक करत आहेत.

 

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!