बुधवारी सकाळी महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात हिरानंदानी येथील सायप्रेस, डैफोडिल मार्केटमध्ये फुटपाथ भागात थाटण्यात आलेल्या दुकानावर आणि बेकायदा बांधकामांवर बुल्डोजरसह कारवाई करत हिरानंदानीकरांना नववर्षाची भेट दिली. यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईसाठी धन्यवाद देत अभिनंदन केले.
हिरानंदानीमधील शॉपिंग प्लाझा आणि मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून लोकांनी फुटपाथवर दुकाने थाटलेली आहेत. काही दुकानदार तर बेकायदा बांधकाम करून, त्या जागा दुसऱ्या दुकानदारांना भाड्याने देवून मलाई खात आहेत. याबाबत येथील स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या आहेत. ज्यानंतर पालिका प्रशासनाने नोटिसी देवून कारवाई सुद्धा केली आहे, परंतु काही वेळातच ही मार्केट पुन्हा सजत होती. याबाबत स्थानिक नागरिक अमोल चव्हाण यांनी पाठपुरावा करत केवळ तात्पुरती नव्हे तर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी अशी मागणी केली होती.
याबाबत अमोल चव्हाण यांनी बोलताना सांगितले “या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे लोकांना त्रास होत होता ज्याचा मी स्वतः पिडीत आहे. बेकायदेशीर बांधकाम करून दुकानदारांनी फुटपाथसह रोड अडवून ठेवले होते. ज्याची तक्रार मी पालिकेकडे केली होती आणि पाठपुरावा करत होतो, हा पाठपुरावा रोखण्यासाठी मला अनेक लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी पाठी हटलो नाही, ज्याचे फळ कारवाईच्या स्वरुपात मिळालेले आहे.”
बुधवारी सकाळीच पालिका एस विभागाचे अतिक्रमण निर्मुलन अधिकारी बुल्डोजर व पोलीस फौजफाट्यासह सायप्रेस, डैफोडिल मार्केट भागात पोहचले होते. अतिक्रमण केलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करून बेकायदा बांधलेले बांधकाम पाडण्यास सुरवात केली. संपूर्ण अतिक्रमण कोणत्याही दबावाला बळी न पडता हटवत, त्यांनी पालिका मोठ्या धनदांडग्यावर सुद्धा कडक कारवाई करू शकते याचे प्रतिकच दिले.
याबाबत उपस्थित पालिका अधिकाऱ्यांनी आवर्तन पवईला सांगितले “येथील अतिक्रमणाबद्दल आमच्याकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या जात आहेत. पालिकेने आधीही कारवाई केली होती, परंतु बेकायदा बांधकाम तोडले जात नसल्याने दुकाने पुन्हा उभी राहत होती. म्हणूनच आम्ही सरळ बांधकामावर कारवाई करत आहोत.””
पालिकेच्या या कारवाईची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी येऊन पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले व पुन्हा ही दुकाने थाटली जावू नये म्हणून पालिकेने दक्षता ठेवावी अशी मागणी केली.
या कारवाईनंतर सुद्धा या मार्केटमध्ये मोठा काही फरक पडला नसून, लोकांनी संध्याकाळ पर्यंत पुन्हा आपली दुकाने थाटलेली आहेत.
No comments yet.