हिरानंदानी समूहाला ४ कोटींची टोपी, कुंपणानेच खाल्ले शेत

fraudनामांकित विकासक हिरानंदानी समूहाला त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने प्रसिद्धीच्या नावावर कोट्यवधीं रुपयांना गंडा घातला आहे. समूहाने आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी हा त्याच समूहात काम करत असताना, मित्राच्या मदतीने खोटी कंपनी स्थापन करून मोठी जाहिरात देण्याच्या नावावर ४ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘कुंपणाने शेत खाणे’ ही म्हण आजवर अनेकांनी फक्त ऐकली असेल; परंतु पवई येथील हिरानंदानी समूहाने हे प्रत्यक्षात अनुभवले आहे. समूहाचे व्यवस्थापक श्री मिरकर नवीन बांधकामांच्या जाहिरातीसाठी जाहिरात एजन्सीच्या शोधात होते. याच समूहात आठ ते दहा महिन्यांपूर्वी नियुक्ती मिळालेले व सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे राहूल ठाकूर यांनी त्यांच्या ओळखीची एक एजन्सी असून, कमीत कमी किमतीत जाहिरात करून घेऊ शकतात असे मिरकर यांना सांगितले.

राहूलने लगेच त्याचा जवळचा मित्र सिद्धेश कदम, जो जिम ट्रेनर म्हणून काम करतो, याच्या मदतीने ‘एस. के. डिजिटल अॅडव्हर्टायझमेन्ट’ नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीचे संकेतस्थळावर प्रोफाइल बनवून ती जानेवारी २०१४ कार्यरत असल्याचे दाखविले. मिरकर यांनी सुद्धा सिद्धेश याच्यावर विश्वास ठेवत ‘एस. के. डिजिटल अॅडव्हर्टायझमेन्ट’ कंपनीला जाहिरातीचे कंत्राट दिले. राहूलने सिद्धेशला समोर न आणताच त्याला केवळ ३० हजार रुपयांचे आमिष दाखवून कंत्राटावर सही करवून घेतली.

काही अवधीनंतर ठाकूर हा कदम याच्या मदतीने कंपनीची फसवणूक करत असल्याची कुणकुण लागताच, समूहाने फसवणूक करणाऱ्या सिद्धेशला नोटिस बजावली. घाबरलेल्या सिद्धेशने मिरकर यांची भेट घेऊन आपला सहभाग नसून, राहूलच्या सांगण्यावरून फसवणूक केल्याची कबुली दिली. ज्यानंतर मिरकर यांनी राहूल विरोधात तक्रार नोंदवली असून आम्ही राहूलला अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राहूलने समूहाला ४ कोटी ८८ लाखांचा गंडा घातला असून, त्याने त्यातून दोन महागड्या गाड्या घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. राहूलच्या अटकेनंतर पोलिसांनी त्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत तसेच त्याने नियुक्तीच्या वेळी खोट्या कागदपत्रांद्वारे तो स्वित्झर्लंड येथून एमबीएचे शिक्षण घेऊन आल्याचे दाखवल्याचे तपासात समोर आले आहे.

या संदर्भात हिरानंदानी समूह व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, त्यांनी या बातमीला दुजोरा देत अधिक बोलण्यास नकार दिला.

 

, , , , , , , , , , , , , , , ,

One Response to हिरानंदानी समूहाला ४ कोटींची टोपी, कुंपणानेच खाल्ले शेत

  1. Amol October 14, 2015 at 9:20 pm #

    बिल्डर ला ४ कोटींचा गंडा पडला तर खाडकन बातम्या प्रसिध्द होतात ?
    पण गरिबांचे शौचालय चोरीला जाते जबरदस्ती तोडले जाते ,ते तोडण्य साठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे कोणतीही योजना न राबवता फायदे घेतले जातात त्यावर पत्रकार काही बोलत नाहीत
    यास काय म्हणावे ?

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!