चांदिवली, संघर्षनगर येथील क्रिस्टल पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना शनिवारी झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता दोन झाली आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाला सोमवारी रात्री २.४० वाजता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांपैकी अजून एकाला बाहेर काढण्यात यश आले. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवल नाईक (२२) असे या कामगाराचे नाव आहे.
चांदिवली, संघर्षनगर बस स्टोपपासून काही अंतरावर सुरु असणाऱ्या क्रिस्टल पार्क या इमारतीचे बांधकाम तांत्रिक आणि शासकीय कचाट्यात अडकल्याने, इमारत पाडण्याचे काम करण्यात येत होते. “या कामासाठी इमारतीच्या सर्वात वरच्या माळ्यांवर क्रेनच्या साहय्याने चार पोकलेन नेण्यात आले होते, तर जवळपास २० ते २५ कामगार तेथे काम करत होते.
“इमारत पाडण्याचे काम सुरु असतानाच शनिवारी संध्याकाळी ५.१५ वाजता इमारतीचा मधला काही भाग तुटल्याने दोन पोकलेनसह तीन माळ्यांचा मधला भाग कोसळला. यामध्ये गौरव मल्हार (३२) याचा मृत्यू झाला होता तर बबलू अजित (२५) आणि त्रीवंदास पासवान (१९) यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची शक्यता आहे,” असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दुर्घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतर मुंबई अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरूच असून, सोमवारी रात्री २.४० वाजता एका कामगाराला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले, त्यामुळे या दुर्घटनेत मृतांची संख्या आता दोन झाली आहे.
“इमारतीच्या वरच्या उरलेल्या भागात अजूनही दोन पोकलेन उभी आहेत. सतत पाऊस पडत असल्याने आणि उरलेला इमारतीचा भाग सुद्धा पडण्याची भिती असल्याने काळजीपूर्वक बचावकार्य सुरु आहे,” असे यावेळी बोलताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.