​हिरानंदानीत घरफोडी, साडेतीन लाखाचा ऐवज साफ

हिरानंदानीतील टोरीनो इमारतीच्या एकतिसाव्या माळ्यावर राहणाऱ्या फिलिप वर्गीस यांच्या घरात प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने ३.५६ लाखाच्या ऐवजावर हात साफ केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत फिलीप यांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मूळचे कोलम, केरळचे असणारे व नामांकित कंपन्यासाठी रोड बनवण्याचे काम करणारे वर्गीस हे गेल्या सहा वर्षापासून हिरानंदानीतील टोरीनो इमारतीत आपली पत्नी आणि मुलगा यांच्या समवेत राहतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या कुटुंबात ‘परिवार संमेलन’ असल्यामुळे ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या गावी गेले होते.

“गावचा कार्यक्रम संपवून परिवारासह घरी परतलो असता घराचे सेफ्टी डोअर उघडे होते, डबल लॉक केलेले मुख्य डोअर केवळ एकदा चावी फिरवताच उघडले. मास्टर बेडरूमचे डोअर लॉक उचकटून आत असणाऱ्या लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने, मोत्याचे हार व सोनेरी रंगाची मनगटी घड्याळे अशा ३.५६ लाखाच्या वस्तूंवर चोरट्याने हात साफ केला आहे”असे वर्गीस यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून टोरीनो सोसायटी आणि आसपासच्या परिसरातले सिसिटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, अधिक तपास करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!