पवईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शनिवार २ मे पर्यंत पवईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे. यात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. नवीन मिळून आलेल्या रुग्णांमध्ये पूर्वी मिळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा समावेश आहे.
शुक्रवार, १ मे रोजी आयआयटी बॉम्बेमधील रहिवाशी असलेली ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. सायन रुग्णालयात वैद्यकीय परिचारिका म्हणून त्या कार्यरत आहेत. याबाबत आयआयटी बॉम्बेचे डायरेक्टर यांनी ट्वीट करत पुष्टी केली होती. याच दिवशी पालिका ‘एल’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वसाहतीत एक ४६ वर्षीय महिला सुद्धा कोरोना बाधित मिळून आली आहे. यापाठोपाठ पवईतील मिलिंदनगर म्हाडा वसाहतीत राहणारा आणि रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा २६ वर्षीय तरुणाचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी हिरानंदानी रुग्णालय जवळील वस्तीत राहणारा २२ वर्षीय तरुण सुद्धा कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
एकाच दिवसात ८ बाधितांची वाढ
शनिवारी, २ मे पवईत विविध परिसरात ८ कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. यापूर्वी मिळून आलेल्या तीन रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा यात समावेश आहे.
मिलिंदनगर येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा शनिवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. २४ एप्रिल रोजी कोरोना बाधित मिळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील त्या सदस्य आहेत. याचवेळी मिलिंदनगर येथील म्हाडा वसाहतीत १ मे रोजी मिळून आलेल्या कोरोना बाधित तरुणाच्या घरातील २८ वर्षीय महिला, ७ वर्ष वयाची मुलगी, ५१ वर्षीय महिला आणि ३३ वर्षीय पुरुष असे ४ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील एकाला हिरानंदानी रुग्णालयात, एकाला सेव्हन हिल रुग्णालयात तर दोघांना पालिका अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा: प्राध्यापकांच्या मित्राचा इमेल हॅक करून, २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
आरे कॉलोनी रोडवर असणाऱ्या गौतमनगर भागात सुद्धा एक तरुणी कोरोना बाधित मिळून आली आहे. तसेच २८ एप्रिलला आयआयटी येथील गौतमनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह मिळून आलेल्या २३ वर्षीय तरुणाचे आई, वडील दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
“पवईतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर येत असले तरी, नवीन मिळून येणारे बाधित हे पूर्वी मिळालेल्या बाधितांच्या संपर्कातील, नातेवाईक किंवा सील केलेल्या परिसरातीलच आहेत. वाढता धोका पाहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
(येथे देण्यात आलेल्या बाधितांची संख्या ही पालिका आणि पोलीस यांच्या नोंदीतून घेण्यात आलेली आहे.)
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.