प्रेमात असताना एका १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून तरुणीला धमकी दिल्याबद्दल एका १९ वर्षीय रोमिओला साकीनाका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. अटक आरोपीने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले आहे.
१९ वर्षीय आरोपी दोघांच्यामधील संबंध संपवल्यानंतरही आणि तिचा मोबाईल नंबर बदलल्यानंतरही तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार पीडित मुलीने ५ मे रोजी पोलिसांत केली होती. आरोपी विरोधात दाखल झालेल्या तक्रारीची माहिती समजल्यानंतर आरोपीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून पीडित मुलीला आणि तिच्या वडिलांना गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली होती. आरोपी हा आंतरराष्ट्रीय क्रमांक दाखविणार्या अॅपचा वापर करून व्हॉट्सअॅप कॉल करत असे.
“आरोपी पीडितेला तिने दिलेल्या तक्रारीवरून धमकावत होता. त्याने पीडिताला तो भारतात नसल्याने कोणीही त्याचा शोध घेऊ शकत नाही असेही सांगितले. तरुणीने आरोपीशी संबंध तोडल्यापासून तो तिचा पाठलाग करून तिला सतावत होता,” असे याबाबत बोलताना साकिनाका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीने आंतरराष्ट्रीय नंबरचा वापर करून धमकी दिली तेव्हा पीडितेच्या वडिलांना धक्काच बसला आणि त्यांनी मुलीच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत देशमुख यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश दगडे आणि तपासी पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा उपयोग करत गोवंडी परिसरात लपून बसलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
“आरोपी आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलिंग आणि एप्लिकेशन वापरत असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण होते. तांत्रिक मदतीमुळे आम्हाला त्याचा शोध घेण्यात मदत झाली,” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलिसांनी सांगितले.
आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दिंडोशी कोर्टासमोर हजर केले असता, त्याला १७ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
No comments yet.